लातूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 लातूर निजामाबाद रस्त्यावर भेगा पडल्या आहेत. रेणापूर शहरातून चाकूरकडे जाणाऱ्या रेणा नदीपासून पुढील सिमेंट काँक्रिटच्या मार्गाला तडे जाण्याचे सत्र सुरूच आहे. दोन वर्षापूर्वी रस्त्याचे काम करण्यात आले आहे. मागील एक वर्षापासून रस्त्याला भेगा पडत आहेत. या बाबत माहिती कळल्यावर या भेगाची डागडुजी करण्यात आली होती मात्र भेगा आणखी वाढत चालल्या आहेत. 


वाहनधारकचा जीव टांगणीला


रस्त्यावर भेगा मोठ्या पडल्यामुळे वेगाने धावणाऱ्या दुचाकींचे टायर स्लीप होऊन अपघात होण्याचा धोका उद्भवत आहे. अंबाजोगाई रोडवरील पिंपळ फाटा सिमेंट काँक्रिटने काम करण्यात आले आहे. रेना नदी ते पानगावकडे वळण घेणाऱ्या रस्त्यापर्यंत सिमेंट रस्ता आहे. तर तेथून पुढे चाकूरकडे डांबरीकरण झालेले आहे. रेणा नदीपासून पुढे 200 मीटर अंतरावर गेल्यानंतर रस्त्यावर तडे गेले आहेत. रस्त्याचे काम होऊन दोन वर्षे झाली असतील. मात्र तडे वर्षभरापूर्वीपासून पडत आहेत. एका तड्याची खोली सायकलचे टायर आत बसेल इतके आहे. त्यात भरधाव मोटारसायकलचे टायर गेल्यास गाडी स्लीप होऊन अपघात घडण्याचा धोका बळावत आहे. मात्र याकडे ना कंत्राटदाराचे लक्ष आहे, ना या रस्ता कामाची गुणवत्ता तपासलेल्या विभागाचे. दुर्दैवाने अपघात घडला तर त्यास जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होत आहे


लातूर शहरात दुचाकीवरून भाजीपाला घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. तसेच या ग्रामीण भागातून दूध घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही मोठी आहे. रस्त्यावर पडलेल्या या मोठ्या भेगांमध्ये पाणी साचल्यामुळे दुचाकी स्लिप होण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात तर अवस्था अतिशय वाईट आहे. रेणापूर गावातून हा रस्ता गेला आहे. वाहनाचा वेग खूप जास्त असतो त्यात गावाजवळच रस्ता खराब झालेला आहे. 


रेणापूर येथील शेतकरी नरसिंग वसेकर  म्हणाले,  मी दररोज दोन ते तीन वेळेस शेताला याच रस्त्याने जातो. नदीपासून हा रस्ता जवळपास दोनशे ते तीनशे फूट रस्त्याच्या मधोमध फाटत गेला आहे. दुचाकीस्वराना यामुळे मोठा त्रास होतो. जीव धोक्यात टाकावा लागतो.