लातूर: अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं अर्थकारण मोडकळीला आणलं आहे. एकाच महिन्यात तीन वेळा अवकाळी पावसाने (Maharashtra Unseasonal Rain) हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे दोनशे हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात नुकसान झाल होते. मात्र शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानीच्या क्षेत्रात कैक पटीने वाढ झाली आहे. तब्बल दीड तास अवकाळी पावसाने जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये हजेरी लावली होती. जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसात अनेक भागात गारपीटीही झाली आहे. वीज कोसळून दोन लोकांचा आणि 13 जनावरांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्याभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


लातूर जिल्ह्यात चाकूर, निलंगा, औसा, रेणापूर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. रबी हंगामातील पिकांची काढणी झाल्याने धोका टळला असला तरी आंबा फळपिकासह भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी वीज कोसळून दोन व्यक्ती आणि 13 जनावरे दगावली आहेत. महिन्याभरात तीन वेळा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने निसर्गाच्या लहरीपणाचा सामना लातूरकरांना करावा लागत आहे.


वीज पडून दोन ठार 


चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे शेतात काम करत असताना अंगावर वीज पडल्याने सार्थक संतोष ढोले (वय 21) हा युवक जखमी झाला होता. उपचारासाठी लातूर येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. आज त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याच्या पश्चात आई-वडील आणि एक बहीण असा परिवार आहे. तर दुसरी घटना तालुक्यातील अंजनसोंडा (खु.) येथे घडली आहे. शेतातील घराच्या पाठीमागे असलेल्या मंगलाताई अशोकराव पाटील (वय 65) यांच्या अंगावर वीज पडली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.


वीज पडून 13 जनावर दगावली


लातूर तालुक्यातील चिकलठाणा येथील शेतकरी संपत रामराव इंगळे यांच्या मालकीच्या दोन बैलांवर वीज पडली. त्यात दोन्हीही बैल दगावल्याचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी दिली. औसा तालुक्यातील वांगजी येथे गोरोबा वाघमारे यांची गाय तसेच उजनी येथील शेतकरी पांडुरंग जाजू यांची कालवड व शिवली येथील बबन जाधव या शेतकऱ्याच्ची म्हैस वीज पडून दगावली. 


अहमदपूर तालुक्यातील तेलगाव येथील शेतकरी ज्ञानोबा कोकरे यांच्या बैल जोडीवर वीज पडल्याने जोडी दगावली आहे. निलंगा तालुक्यातील कलमुगळी येथील ज्ञानेश्वर शिवाजी वाघमारे यांची म्हैस व गहीनिनाथ व्यंकट गोबडे यांच्या म्हशीचे लहान वासरू वीज पडून मयत झाले. टाकळी येथील श्रीरंग गोविंद नरहारे यांच्या दोन म्हैस व गणपती काशिनाथ बिरादार यांची एक म्हैस वीज पडून दगावली आहे. चाकूर तालुक्यातील झरी (खु.) येथील शेतकरी अंकुश बाबुराव सुर्यवंशी यांच्या गायीचा वीज पडून मृत्यू झाला आहे.


भाजीपाल्याचे फळबागेचे नुकसान


लातूर भागात मोठ्या प्रमाणात केशर आंब्याच्या बागा आहेत. तसे एक्सपोर्ट क्वालिटीचे द्राक्ष लातूरमध्ये उत्पादित केली जातात. जोरदार वार आणि गारपिटीमुळे या बागेंना मोठा फटका बसला आहे. पानचिंचोली येथील शेतकरी जयराज भोसले हे प्रचंड त्रस्त आहेत. "माझी तीन एकर वरची अंबा बाग या पावसात सापडली आणि हो त्याचं नव्हतं झालं. 17 लाख रुपये च नुकसान आहे. 'हा पडलेला आंब्याचा खच माझी चिता आहे' अशीच उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 


द्राक्ष बागेलाही या पावसाचा फटका बसला आहे. ज्या लोकांनी अद्याप ज्वारी काढली नाही त्यांना या पावसामुळे नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था तर अतिशय वाईट झाली आहे. 
   
मागील महिन्याभरात ही तिसरी वेळ गारपिटीची आहे. मागील दोन गारपीटीत शेतकऱ्यांचा मोठा प्रमाण नुकसान झालं होतं. गारपीटी तब्बल 200 हेक्टर शेत जमिनीवरच नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र काल झालेला पाऊस हा सर्व दूर होता. यामुळे नुकसानीच्या क्षेत्रात प्रचंड वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 


ही बातमी वाचा: