Latur Unseasonal Rain : लातूर जिल्ह्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली असूनकाही भागात गारांचा पाऊस पडल्याचं दिसून आलं. त्यामुळे काही ठिकाणी आंबा आणि द्राक्षे बागांचं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे अक्कलकोटमध्येही तुफान पाऊस (Akkalkot Rain) पडला असून बसलेगाव ते गरोळगी या दोन गावाची वाहतूक बंद झाली आहे.
मागील काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात उकाडा वाढला होता. शनिवारी दुपारपासूनच जिल्ह्यात ढग दाटून आले होते. मागील एक तासापासून लातूर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. जोरदार वाऱ्यासह विजेचा गडगडात सुरू होता. यातच तुफान पावसाने सुरुवात केल्याने जनजीवन विस्कळीत झाला आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी तुफान पाऊस आणि गारा
लातूर शहर लातूर ग्रामीण भागामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली होती. कोपेगाव गंगापूर या भागामध्ये गारांचा पाऊस पडला आहे.निलंगा तालुक्यातील कासार शिरशी, हासोरी परिसरात वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस पडला आहे. लातूर ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. औसा तालुक्यातील गावातही पावसाची हजेरी होती.
पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
भर पावसाळ्यातही पडला नसेल इतका तुफान पाऊस मागील एक तासापासून सुरू आहे. जोरदार वारं आणि विजेचा गडगडात याचा थेट परिणाम थेट पिकांवर होताना दिसतोय. ज्वारी पिकाचे नुकसान या पावसामुळे अधिक प्रमाणात झालं आहे. किल्लारी भागात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बाग आहे. जोरदार वारा आणि पावसामुळे द्राक्षांच्या बागेवर परिणाम होताना दिसत आहे. लातूर जिल्ह्यात अनेक भागात केशर आंब्याच्या बागा आहेत. या पावसाने केशर आंब्याच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अक्कलकोटमध्ये दोन गावांची वाहतूक बंद
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे. अवकाळी पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील बसलेगाव ते गरोळगी या दोन गावाची वाहतूक बंद झाली आहे. महामार्गावर पाणीच पाणी झालंय. तर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावलीय.
नुकसानीत वाढत होत आहे
काही दिवसापूर्वी जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी 200 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर अवकाळी पावसाचा फटका बसला होता. अवकाळी पावसाच्या नुकसानीचे माहिती घेण्याचं काम प्रशासनाचे सुरू होतं. त्यातच आजचा पाऊस हा अतिप्रचंड असल्याने नुकसानीचे क्षेत्रात आता वाढ होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेलं प्रशासन या नुकसानीचा अंदाज आणि माहिती घेण्यात किती तत्परता दाखवते हे पाहावं लागेल.
ही बातमी वाचा: