Latur Unseasonal Rain : लातूर (Latur) जिल्ह्यात काल (14 एप्रिल) दुपारपासून सर्वत्र ढगाळ वातावरण होते. संध्याकाळपर्यंत जिल्ह्यातील अनेक भागात हलका पाऊस (Rain) पडून गेला होता. मात्र मध्यरात्रीनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसाने झोडपून काढल्यामुळे भाजीपाला (Vegetable) मातीमोल झाला आहे.
लातूर जिल्ह्यातील लातूर शहर, औसा, निलंगा, वलांडी परिसरात सायंकाळच्या सुमारास वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणच्या लाईट गुल झाल्या. दिवसभर कडाक्याचं ऊन होते त्यानंतर दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले. काही ठिकाणी पाऊस पडल्यामुळे उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे. मात्र शेतीला या पावसाचा फटका बसला आहे.
भाजीपाला आणि फळबागांचं नुकसान
लातूर जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळ तालुक्यातील बिबराळ शिवारात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. त्यामध्ये टोमॅटो (Tomato) पिकांचे मोठे नुकसान झालं आहे. मारोती जन्मले यांची पाच एकर तर दिनकर जाधव यांचा दोन एकर टोमॅटोचा प्लॉट पूर्णपणे वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठा नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी टोमॅटो आता बांधावर फेकून दिले आहेत. तात्काळ पंचनामे करण्याची मागणी या शेतकऱ्याने आता केली आहे.
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किल्लारी आणि आजूबाजूचा परिसर तसाच रेणापूर तालुक्यातील पानगाव आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागेचे क्षेत्र आहे. तसेच जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणामध्ये केसर आंब्याची बागही आहे. या पावसामुळे द्राक्षबाग आणि आंब्याच्या बागेचे नुकसान झाल्याचे पाहावयास मिळत आहे
अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) घेरले..
काही ठराविक अंतरानंतर सातत्याने होत असलेल्या अवकाळी पावसामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला आहे. शेतीचं अर्थकारण या अवकाळी पावसाने अक्षरशः मोडून टाकलं आहे. बाजारात शेतमाला उठाव नाही आणि त्यातच होणारे हे नुकसान शेतकऱ्याची आर्थिक घडी तोडणारी आहे.
मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा
राज्यात अवकाळी पावसाचं थैमान सुरुच आहे. हवामान विभागाने राज्यात पुन्हा एकदा गारपिटीचा इशारा दिला आहे. पुढील काही दिवसाच मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाळा कायम राहण्याची शक्यता आहे. या पावसामुळे शेतकरी मात्र चांगलेच हवालदिल झाले आहेत. कारण हाती आलेली पिके या पावसामुळे वाया जात असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
संबंधित बातमी
Latur Rain : लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, वातावरणात गारवा