Latur Tomato Farmer: लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातल्या सेलू गावच्या मोहन पंडगे आणि राजाभाऊ पंडगे या दोघा भावांना टोमॅटो दरामध्ये (Tomato Price) झालेल्या वाढीचा जबरदस्त फायदा झाला आहे. या दोघांनी आतापर्यंत 60 लाख रुपयांचे टोमॅटो विकले आहेत, उर्वरित काळात आणखी टोमॅटोच्या विक्रीतून त्यांना सुमारे 40 लाख रुपये मिळण्याचा अंदाज आहे. म्हणजेच टोमॅटोतून त्यांना एकूण 1 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय तीन एकर नव्याने लागवड केलेल्या टोमॅटोचे देखील पुढच्या महिन्यापासून उत्पादन सुरू होणार आहे आणि त्यातूनही त्यांना किमान 30 ते 40 लाख रुपये फायदा होणार आहे.


टोमॅटोतून मिळालेल्या नफ्यातून खरेदी केल्या गाड्या


सेलू गावातले मोहन पंडगे आणि राजाभाऊ पंडगे दोघं भाऊ गेली 40 वर्षं आपली 50 एकर शेती कसतात. गेल्या आठ-नऊ वर्षांपासून पंडगे भाजीपाला पिकाकडे वळले. टोमॅटो, काकडी, कारलं, भोपळा अशा फळभाज्यांची लागवड ते करतात. राजाभाऊ पंडगे यांचा दावा असा आहे की, बाजराचा अंदाज घेऊन जर टोमॅटोची लागवड केली तर कधीही शेती तोट्यात जात नाही. सात वर्षांपूर्वी सुद्धा पंडगेंना टोमॅटो विक्रीतून भरघोस नफा मिळाला होता, त्यावेळी पंडगे बंधुनी डस्टर गाडी खरेदी केली होती. यावर्षी टोमॅटोतून मिळालेल्या भरघोस नफ्यातून त्यांनी स्कॉर्पिओ ही महिंद्राची नवीन गाडी खरेदी केली आहे.


काय आहे पंडगे बंधूंचं टोमॅटो शेतीचं गणित?


पंडगे बंधूंना टोमॅटोच्या शेतीचे गणित नीट जमलं आहे. पंडगे इतरांच्या आधी म्हणजे फेब्रुवारी महिन्यातच टोमॅटोची लागवड करतात, त्यामुळे जून-जुलैमध्ये टोमॅटो प्रत्यक्ष बाजारात यायला सुरुवात होते. लागवडीआधी इतर ठिकाणी किती लागवड झाली आहे? याची माहिती ते घेतात. त्यामुळे याही वर्षी त्यांना आपल्या टोमॅटोला भाव मिळेल असा अंदाज होता, पण सध्या त्यांना बंपर लॉटरीच लागली आहे.


शेतकऱ्याची मुलंही उच्च शिक्षित


या दोघा भावांना मिळून चार मुलं आहेत. त्यातली एक मुलगी डॉक्टर आहे, मुलगा इंजिनियर आहे. एका मुलाने स्वतःचा उद्योग सुरू केला आहे, तर चौथा मुलगा शेतामध्ये काम पाहतो. राजाभाऊ पंडगे यांचं सातारा जिल्ह्यातल्या पाचगणीला शिक्षण झालं आहे. पुढे पॉलिटेक्निक पर्यंत राजाभाऊ शकले. परंतु राजाभाऊंनी कधीही शेती शिवाय इतर विचार केला नाही.


कसं आहे शेतीचं नियोजन?


पंडगे कुटुंब हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. त्यांनी आपल्या पन्नास एकर शेतीसाठी चार किलोमीटर अंतरावरून एका सिंचन तलावातून पाण्याची पाईपलाईन आणली आहे. विजेसाठी दोन स्वतंत्र फिडर उभे केले आहेत. पंडगे कुटुंबाकडे दीड लाख रुपये वार्षिक पगाराचे सात शेतगडी आहेत. या गड्यांना राहण्यासाठी एका एका खोलीची व्यवस्था केलेली आहे. तर पंडगे बंधूंकडे 20 हून अधिक गाई-म्हशी आहेत. जनावरांसाठी मुक्त गोठा आहे. योग्य व्यवस्थापन केल्यास कोणताही भाजीपाला हा शेतकऱ्याला पैसा मिळवून देतोच, असं पंडगे बंधूंचं म्हणणं आहे.


हेही वाचा:


Skin Glow: हिरव्या भाज्यांचा ज्युस प्यायल्याने दोन आठवड्यात त्वचा बनते चमकदार? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत