लातूर: एड्स हा जीवघेणा आजार, कोणताच दोष नसलेली मुले एचआयव्ही संक्रमित होऊन जन्माला येतात. मात्र या मुलांना योग्य आहार औषध उपचार आणि वातावरण दिलं तर ती मुले आयुष्य आनंदाने जगू शकतात तुमच्या-आमच्यासारखं लग्नही करू शकतात. पाच एचआयव्ही संक्रमित जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा शनिवारी लातूर जिल्ह्यात अतिशय धुमधडाक्यात पार पडला.


लातूर जिल्ह्यातील हसेगावात मागील अनेक वर्षांपासून एचआयव्ही संक्रमित मुलांचे संगोपन केलं जातं. प्राध्यापक पत्रकार रवी बापटले हे काम मागील अनेक वर्षापासून करत आहेत. 2007 मध्ये त्यांच्या सेवालयात एक एचआयव्ही संक्रमित असलेलं लहान मूल दाखल झालं. आज त्याच मुलाचे लग्न. त्याचबरोबर इथे दाखल झालेल्या पाच जोडप्यांचेही लग्न सामूहिक पद्धतीने लावण्यात आले.
       
एचआयव्ही संक्रमित असलेल्या मातेपासून जन्मलेली मुले ही एचआयव्हीग्रस्त असतात. अशा मुलांच्या संगोपनाचा प्रश्न अतिशय गंभीर बनलेला असतो. अशाच मुलांचे संगोपन करण्यासाठी लातूर येथील प्राध्यापक रवी बापटले यांनी मागील काही वर्षापासून सेवालय नावाची सेवाभावी संस्था स्थापन केली. संपूर्ण महाराष्ट्रभरातून अनेक जिल्हा आणि गावातून इथे लहान मुले दाखल झाली. योग्य औषध उपचार, उत्तम वातावरण आणि सकस आहार, व्यायाम याद्वारे या मुलांची मानसिक आणि शारीरिक शक्ती वाढवण्याचे काम इथे होत असतं.
      
येथील मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिथेच त्यांना छोटी मोठे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांचा आर्थिक वृद्धी करण्याचा प्रयत्नही होत असतो. अशी मुलं उपवर झाल्यानंतर तिथेच त्यांची लग्नही लावण्यात येतात. येथील पाच मुलं आणि पाच मुली यांचा सामूहिक विवाह लावण्यात आला आहे.


ज्या मुलांचे कुटुंबीय आई-वडील हे त्यांची देखभाल करण्यासाठी येत असतील त्यांनाही निमंत्रण दिलंय. ज्या मुलांचे आई-वडील किंवा कुटुंबीय येत नाहीत किंवा मृत्यू पावले आहेत अशा मुलांसाठी पालकत्व दिली जातात. या संस्थेस आर्थिक हातभार लावणारी अनेक लोक आहेत. त्यांना एका एका जोडप्याचे पालकत्व दिले गेले आहे.


विवाह सोहळया साठी सेवालय सजले


शिवालयात होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी मोठी तयारी करण्यात आली होती. मंडप, सजावट, जेवणावळी, स्टेज आणि शेकडो वऱ्हाडी मंडळी म्हणून आलेले पाहुणे. या सर्वांनी एका वेगळ्या लग्नास हजेरी लावली होती 


2007 पासून सेवालय सुरू झाले आणि येथे आजपर्यंत 18 लग्ने लावली गेली आहेत. एचआयव्ही संकमित असलेल्या मुलांसाठी आम्ही कायमच आल्हादायक आणि उत्तम वातावरण निर्मिती केली आहे. आताच्या औषधामुळे मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि त्यांचे जीवनमान ही वाढलं आहे. एचआयव्ही संक्रमित जोडप्यांना मूल झालं तर ते एचआयव्ही संक्रमित असत नाही. यामुळे त्यांना ही सर्वसामान्य जीवन जगण्याचा अधिकार आहे. हा विचार करून आजपर्यंत अठरा विवाह येथे लावण्यात आली आहेत. आज पाच जोडप्यांचा विवाह लावताना निश्चितच आनंद होतो असे मत सेवालालयाचे प्रमुख प्राध्यापक रवी बापटले यांनी व्यक्त केला आहे.


माझ्यासारख्या अनेकांनी येथे या जोडप्यांचे पालकत्व स्वीकारला आहे. कर्मकांडांना फाटा देत सत्यशोधकी पद्धतीने विवाह लावण्यात आला आहे. सामाजिक उपक्रमासाठी अनेक जण एकत्र आलं तर काय होतं त्याचे हे उदाहरण आहे असे मत एका जोडप्याचे पालकत्व घेतलेले अॅड दीपक बनसुडे यांनी व्यक्त केल आहे.