लातूर: लातूर (Latur News) जिल्ह्याचे राजकारण हे पाणी आणि महात्मा बसवेश्वरांचा पुतळा याच भोवती मागील अनेक वर्षापासून फिरत आहे. आता राष्ट्रीय महामार्गात येणाऱ्या महात्मा बसवेश्वराचा पुतळा हटवण्यावरचं राजकारण तापलं होतं.  आमरण उपोषण ही सुरू होतं. प्रशासनाने सर्वानुमते सर्वमान्य होईल असाच निर्णय घेण्यात येईल असे लेखी पत्र दिल्यानंतर चार दिवसापासून सुरू असलेल्या अमरन उपोषण अखेर थांबले. मात्र राजकारण असंच सुरू राहणार आहे असे चित्र दिसत आहे.


रत्नागिरी-नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361चं काम युद्धपातळीवर सुरू आहे.  हा राष्ट्रीय महामार्ग लातूर शहरातून गेलेला आहे. या महामार्गावर येणारा महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा हटवण्यासंदर्भातचा हालचाली प्रशासनाकडून सुरू होत्या. यामुळे संतप्त झालेल्या लिंगायत समाजाच्या वतीने 19 एप्रिलपासून आमरण उपोषण सुरू होतं.  या उपोषणाला शिवसेना भाजप काँग्रेस यासह इतर अनेक पक्षांनी संघटनेने ही पाठिंबा दिला होता.  शेवटी प्रशासनाने यासंदर्भात निर्णय घेत सर्वानुमते आणि सर्वमान्य होईल असाच निर्णय घेतला जाईल असे लेखी पत्र दिले.  यानंतर उपोषण स्थळी जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन दाखल झालं.  उपोषणकर्ते डॉक्टर अरविंद भातंबरे आणि त्यांच्या इतर तीन सहकाऱ्यांना नारळ पाणी देत उपोषणाची सांगता करण्यात आली. 


प्रशासनाने मी दिलेला शब्द पाळला नाही तर उपोषणाचा इशारा


प्रशासनानं आज पत्र जरी दिले असेल तर त्यात कुठेही पुतळा हटवला जाणार नाही असे लिहिलेले नाही. प्रशासनाने दिलेल्या पत्राला मान देऊन आम्ही उपोषण मागे घेत आहे, आंदोलनाची ही फक्त सुरुवात आहे. जर प्रशासनाने मी दिलेला शब्द पाळला नाही तर लिंगायत समाजाचे अनेक धर्मगुरू उपोषणाला बसतील असा इशारा यावेळी कोरनेश्वर मठाचे मठाधिपती यांनी दिला आहे. 


महात्मा बसवेश्वर हे सर्व विश्वातले आद्य समाजसुधारक होते.  त्यांच्याबद्दल आम्हाला अत्यंत सन्मान आहे. हा पुतळा इथून हटणार नाही.  शहरातून राष्ट्रीय महामार्ग कसा गेला याबाबतची माहिती घेऊ तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर हा विषय मांडणार आहे. राष्ट्रीय महामार्ग शहराच्या बाहेरून कसा नेता येईल याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे मत लातूरचे खासदार सुधाकर शिंगारे यांनी व्यक्त केला आहे. महात्मा बसवेश्वराच्या पुतळ्याचा वाद हा लातूरला काही नवीन नाही. विलासराव देशमुख सारख्या नेत्यांचा पराभवाचे एक कारण ही महात्मा बसवेश्वराच्या पुतळ्याचा विषयच होता. आता तोच विषय पुन्हा एकदा पेटत आहे. याचा भविष्यातील राजकारणावर नक्कीच परिणाम होणार असे चित्र सध्या तरी दिसत आहे.