Latur Accident News: लातूरच्या (Latur) अहमदपूर तालुक्यातील कोपरा गावानजिकच्या वळणावर केमिकलने भरलेला टँकर वळणावर उलटला असल्याची घटना आज बुधवारी पहाटे पाच घडली आहे. हा टँकर बडोदा येथून केमिकल भरुन विशाखापट्टणमकडे जात होता. विशेष म्हणजे टँकर उलटल्याने केमिकलची गळती सुरू झाली. ज्यामुळे परिसरात उग्र वास पसरत धुराचे लोट निर्माण झाले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, या भीतीने घटनास्थळ परिसरातील 200 मीटर परिसरात नागरिकांना प्रवेशास बंदी घातली आहे. या अपघातात टँकरचालक जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे.  


याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बडोदा येथून हेक्झा मेथीलिन नावाचे केमिकल घेऊन ट्रँकर (एमएच 20, इजी 8173 ) हा हैदराबादमार्गे विशाखापट्टणमकडे जात होता. दरम्यान केमिकल घेऊन जाणारा हा टँकर लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील कोपरा गावाजवळील वळणावर पहाटेच्या सुमारास चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने नियंत्रण सुटले. त्यामुळे टँकर तिथेच उलटला. टँकर  पलटी झाल्याने केमिकलची गळती सुरु झाली आणि त्यामुळे उग्र वास येवू लागला. दरम्यान नागरिकांनी  केमिकलकवर पाणी मारण्याचा प्रयत्न केला असता त्यातून धूर निर्माण होत आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लातूर, उदगीर व अहमदपूर येथील अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात असून, जवान केमिकलमुळे निर्माण होत असलेला धूर आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. 


अहमदपूर तालुक्यातील कोपरा गावाजवळील वळणावर केमिकल घेऊन जाणारा ट्रँकर पलटी झाल्याने, उग्र वास येऊ लागला. तर वासामुळे अपघातस्थळानजिकच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास कोणताही धोका होऊ नये म्हणून प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. तसेच खबरदारी म्हणून अपघातस्थळापासून 200 मीटर परिसरात नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तर याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी निकेतन कदम यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या आहे. तसेच तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, गटविकास अधिकारी अनिलकुमार अंदेलवार, जिल्हा परिषदेचे डॉ. बालाजी बरुरे, सपोनि. भाऊसाहेब खंदारे यांच्यासह वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तळ ठोकून आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाला देखील याबाबत अपडेट देण्यात आले आहे. 


नागरिकांनी घाबरुन जाऊ नयेत...


दरम्यान या अपघातानंतर परिसरात प्रचंड उग्र वास येत असल्याने घटनास्थळ परिसरात नागरिकांनी येऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आला आहे. तर ट्रँकर पलटी झाल्यावर रस्त्यावर केमिकल सांडले असल्याने रस्ता स्वच्छ केला जात आहे. तसेच प्रशासनाकडून योग्य ती सर्व काही कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी घाबरु नये असेही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Latur APMC Election: लातूर कृषी बाजार समितीमधील काँग्रेसच्या वर्चस्वाला भाजपचे आव्हान; 30 वर्षानंतर सत्ताबदल होणार?