Latur News : लम्पी आजाराने (Lumpy Disease) पशुपालक हैराण असतानाच आता पिसाळलेल्या कुत्र्याने (Rabid Dog) चावा घेतल्यामुळे जनावरे दगावत असल्याने पशुपालक त्रस्त झाले आहेत. लातूर (Latur) जिल्ह्यातील फत्तेपूर इथे 15 जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.  


संसर्गामुळे 15 जनावरे दगावली, तर एकाच महिन्यात 20 हून अधिक जनावरांचा मृत्यू


औसा तालुक्यातील फत्तेपूर (Fattepur) परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यांने चावा घेतल्याने 15 जनावरे दगावली आहेत. गावाला पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने भेट दिली असून, लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे. फत्तेपूर गावात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने, त्यातून झालेल्या संसर्गामुळे 15 जनावरे दगावली आहेत. तसेच इतर आजारामुळे गावातील पाचपेक्षा जास्त जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. एका महिन्यातच 20 पेक्षा जास्त जनावरे मृत झाल्यामुळे गावात चर्चा सुरु झाली असून भीतीचं वातावरण तयार झालं आहे.


फत्तेपूरमधील पशुपालक अनुराधा माळी यांच्या जनावराला तीन दिवस औषध उपचार केल्यानंतरही वाचवता आलं नाही. पशू वैद्यकीय अधिकारी यांनी निदान केले रेबीजचे, मात्र त्यास कुत्रा चावलाच नाही तर असं कसं झालं असा प्रश्न अनुराधा माळी यांना पडला आहे. तर आणखी एक पशुपालक विलास धानुरे यांचीही जनावरं तीन दिवसात आजारी पडून गेली. आलेल्या दोन डॉक्टरांनी वेगवेगळी निदान सांगितलं. जनावरांना संसर्ग कसा झाला, हा कुत्रा कुठून आला, तो जनावरांना कधी चावला याची माहिती पशुपालकांना देखील नाही. 


15 जनावरं रेबीजमुळे मृत्युमुखी पडली?


पशुधन विकास अधिकारी आणि त्यांचे पथक गावात दाखल झालं. आजारी असणाऱ्या विविध जनावरांच्या तपासण्या करण्यात आल्या. तपासणी अहवाल आल्यानंतर स्पष्ट झालं की 15 जनावरं ही रेबीजमुळे (Rabies) मृत्युमुखी पडली आहेत, अशी माहिती औसामधील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर ताराचंद निंबाळकर यांनी दिली. "त्या गावात पिसाळलेला कुत्रा आला होता. तो चावल्यानंतर लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. यावर फक्त लसीकरण हाच उपाय आहे. शास्त्रीय पद्धतीने लसीकरण न झाल्याने जनावरं रेबीजमुळे मृत्युमुखी पडली," असंही ते म्हणाले.


गावात चिंतेचं वातावरण


लम्पी आजारात पशुधन मृत्युमुखी पडल्यास त्यांना नुकसान भरपाई मिळते मात्र रेबीजसारख्या आजाराने पशुधन मृत्युमुखी पडल्यास शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही. एकाच गावात महिन्याभराच्या आत 15 जनावर रेबीजमुळे मृत्यूमुखी पडल्याने गावात चिंतेचं वातावरण आहे.


VIDEO : Latur : पिसाळलेल्या  कुत्र्याच्या चाव्यानंतर 15 जनावरे दगावल्याचा दावा ABP Majha