Latur Crime News : लातूर (Latur) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, मुलानेच आपल्या आईच्या डोक्यात लोखंडी मुसळ घालून तिचा निर्दयीपणे हत्या (Murder) केली आहे. दारू पिण्यासाठी पैसे देण्यास आईने नकार दिला होता, त्यामुळेच या दारूड्या मुलाने आईचा जीव घेतला असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संगीता नाथराव मुंडे (वय 40 वर्ष रा. सताळा, ता. अहमदपूर) असे मारहाणीत मयत झालेल्या आईचे नाव असून, ज्ञानेश्वर नाथराव मुंडे (वय 23 वर्ष) असे आरोपी मुलाचे नाव आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ज्ञानेश्वर याचे माध्यमिक शिक्षण अर्धवटच झाले आहे. सध्या तो शेतीत काम करतो. दरम्यानच्या काळात मित्रांच्या संगतीने तो दारुच्या आहारी गेला. गावातील नदीच्या बाजूला असलेल्या शेतात त्यांचे घर आहे. आई-वडील आणि ज्ञानेश्वर तिघेही याच ठिकाणी राहतात. तर, ज्ञानेश्वरचा छोटा भाऊ कृष्णा हा पुणे येथे एका खाजगी कंपनीत कामाला आहे. दरम्यान, शुक्रवारी ज्ञानेश्वरचे वडील कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. त्यामुळे, शेतातील घरात आई संगीता व मुलगा ज्ञानेश्वर हे दोघेच होते. दारुची सवय जडलेल्या ज्ञानेश्वर याला दारू पिण्याची इच्छा झाली. नुकतीच म्हैस विकल्याने घरात आईकडे पैसे असतील, असा अंदाज काढून दारू पिण्यासाठी ज्ञानेश्वर याने आईकडे पैशाची मागणी केली. तेव्हा 'माझ्याकडे पैसे नाहीत' म्हणताच घरात ठेवलेल्या डब्यातील डाळ व इतर जीवनोपयोगी साहित्य तो विक्रीसाठी घेऊन जात होता. घरातील किराणा साहित्य घेऊन जाण्यास आईने त्याला विरोध किला. तेव्हा रागाच्या भरात उखळात कुटण्यासाठी वापरण्याची लोखंडी मुसळ त्याने आईच्या डोक्यात मारून तिला गंभीर जखमी केले.


रक्ताच्या थारोळ्या पडलेल्या आईला सोडून निघून गेला...


आईच्या डोक्यात लोखंडी मुसळ मारल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली. तरीही तिचा कोणताही विचार न करता ज्ञानेश्वर याने घरातील कुलर वेगात चालू केले. ते तसेच सुरू ठेवून त्याने घर बंद केले. दरवाजाला बाहेरून कडी लावली. साहित्य घेऊन तो पळून गेला. 


वडीलांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल...


दरम्यान, गावातील सुनील मुंढे यांच्या घरी कार्यक्रम असल्याने कार्यक्रमाला बोलवण्यासाठी दोघे मुल ज्ञानेश्वर याच्या घराकडे आले होते. तेव्हा घराला बाहेरून कडी लावलेली असताना आत कूलर चालू कसे, असे म्हणून त्या दोन मुलांनी दरवाजाची कडी काढून पाहिली. तर आत संगीता मुंडे या रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या दिसून आल्या. तत्काळ परिसरातील लोक जमा करून त्यांना सताळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले. लातूर येथील दवाखान्यात डॉक्टरांनी तपासले तेव्हा त्यांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, याक्ररणी आरोपी ज्ञानेश्वर याचे वडील नाथराव मुंडे यांच्या फिर्यादीवरून किनगाव पोलीस ठाण्यात मुलगा ज्ञानेश्वर मुंडे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Pune Crime News : बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय; 25 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या