Latur Monsoon Update: मागील अनेक दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या पावसाने अखेर राज्यात बरसण्यास सुरुवात केली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार एन्ट्री केली असून लातूर (Latur) जिल्ह्यात देखील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे लातूर  जिल्ह्यात सर्वत्र पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज सकाळपासूनच लातूर जिल्ह्यात प्रचंड उकाडा जाणवत होता. दरम्यान लातूरमधील औसा तालुक्यात अनेक भागात पावसाने हजेरी लावली. तर पेठ वासनगाव, औसा आणि इतर अनेक भागात जोरदार पाऊस बरसला. तर निलंगा भागातील कासार शिरशी आणि परिसरात देखील पावसाने बॅटींग सुरु केली. 


पावसामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद पसरल्याचं चित्र सध्या आहे. तर पहिलाच पाऊस हा पेरणीयोग्य झाल्याचं म्हटलं जात आहे. राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतीची मशागत देखील करुन ठेवली होती. तसेच पेरणीसाठी बियाणे देखील खरेदी केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रतीक्षा होती ती पावसाची. येत्या काही दिवसामध्ये जर पावसाचा जोर असाच राहिला तर लवकरच शेतकऱ्यांना पेरणी करता येणार आहे. 


लातूर जिल्ह्यातील कासार,  शिरशी,  लामजना आणि  किल्लारी या भागात देखील पावसाने तुफान बॅटींग केली आहे. दरम्यान पहिलाच पाऊस दमदार झाल्याने शेतकऱ्यांनी आता पेरणी करण्याची तयारी सुरु केली असल्याचं म्हटलं जात आहे. तर पहिल्याच पावसात जिल्ह्यातील ओढे आणि तलावात देखील पाणी भरले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील धरणं देखील कोरडी ठाक पडली आहेत. पण आता या संकटापासून देखील महराष्ट्राची सुटका होणार असल्याचं चित्र सध्या राज्यात आहे. 


दरम्यान कासार,  शिरशी,  कोराळी या भागातील ओढ्यात पाणी भरल्यामुळे येथे पाणी पुलावरुन वाहू लागले आहे. त्यामुळे येथील वाहतूक देखील ठप्प झाली आहे. निलंगा,  कासार,  शिरशी,  कोराळी मार्गे हा रस्ता कर्नाटकातील बसवकल्याणपर्यंत जातो. तर पुढे हा मार्ग हैद्राबाद महामार्गाला जोडला जातो. त्यामुळे जरी हा मुख्य नसला तरी या रस्त्यावरुन वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे आता ओढ्याचे पाणी पुलावरुन जात असल्याने येथील वाहतूक ठप्प झाली आहे. 


येत्या पाच दिवसांत राज्यात मान्सून सक्रिय होणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज आणि यलो अर्लट देखील देण्यात आला आहे. राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना देखील दिलासा मिळल्याचं पाहायला मिळत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Rain Update : अखेर राज्यात मान्सूनच्या प्रवासाला सुरुवात, कोकणात ऑरेंज अर्लट तर मुंबई, पुण्याला यलो अलर्ट