Agriculture News : कृषी विभागाने (Department of Agriculture) केलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या दोन कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरुपी रद्द केले आहेत. तर 14 केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. लातूर (Latur) जिल्ह्यात कृषी विभागानं ही कारवाई केली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे आणि खते पुरवठ्यासाठी कृषी विभागाने काही सूचना केल्या होत्या. त्या सूचनांचे पालन न केल्यामुळं ही कारवाई करण्यात आली आहे.


कृषी सेवा केंद्र चालकांचे धाबे दणाणले


कृषी आयुक्तांच्या सूचनेनुसार लातूर जिल्ह्यातील भरारी पथकामार्फत कृषी निरीक्षकांकडून कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान कृषी सेवा केंद्रात विक्री परवाना दर्शनी भागात न लावणे, साठा आणि भाव फलक सहज दिसेल अशा ठिकाणी नसणे, साठा नोंदवही अद्ययावत न ठेवणे, बिलावर शेतकऱ्यांची सही अथवा अंगठा न घेणे, विक्री बिलात बियाण्यांचा संपूर्ण माहिती न देणे अशा अनेक त्रुटी या केंद्रामध्ये आढळून आल्या होत्या. तसेच खत आणि औषधांमध्ये लिंकिंग करुन विकण्याचे प्रकार करणे, जिल्ह्यातील औसा तालुक्यात पाच, लातूर तालुक्यात तीन, अहमदपूर तालुक्यात चार, चाकूर तालुक्यातील दोन तर रेनापुर आणि निलंगा तालुक्यात प्रत्येकी एक अशा 16 केंद्रांवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी दोन केंद्राची परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. कृषी विभागाच्या या कारवाईमुळे कृषी सेवा केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहेत.


गैरप्रकार करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई 


लातूर जिल्ह्यातील 70 टक्के केंद्रांची तपासणी झाली आहे. अद्यापही काही केंद्रांच्या सतत तक्रारी येत होत्या. तपासणी केली असता यातील 16 केंद्राबाबत कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रभारी जिल्हा कृषी अधिकारी रक्षा शिंदे यांनी दिली. 14 कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तर दोन केंद्राचे परवाने हे कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. जर कुणी गैरप्रकार करत असतील तर त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल. आमची अनेक पथकं सातत्याने या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याची माहिती रक्षा शिंदे यांनी दिली. 


शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत


राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत कायम आहेत. पावसामुळं शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर काही ठिकाणी पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं सध्या शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची सक्त गरज आहे. लवकर पाऊस न पडल्यास आहे ती पिकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी पिकं वाया गेली आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


Nashik Kharip Season : बोगस खत विक्री केंद्रावर कृषी विभागाची कारवाई, गुन्हे दाखल, अनेक दुकानांची खते विक्री बंद