लातूर : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी त्यांचं उपोषण गुरुवार (02 नोव्हेंबर) रोजी स्थगित करण्याआधीच लातूरमधील (Latur) तरुणाने त्याचं आयुष्य संपवलं. त्यानंतर त्याचा मृतदेह हा उपोषण स्थळी ठेवण्यात आलाय. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा निर्णय या तरुणांच्या कुटुंबाने आणि ग्रामस्थांनी घेतला आहे. दरम्यान गोविंद देशमुख यांनी आपल्या शेतात गळफास घेत आत्महत्या केली. 


 मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन 50 टक्के च्या आत मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी बोरगाव काळे येथील गोविंद मधुकर देशमुख त्यांचं आयुष्य संपवलं. मनोज जरांगेंच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात यासाठी त्यांनी 72 तासांचे उपोषण केले होते. पण गुरुवार (2 नोव्हेंबर) रोजी त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं. दरम्यान सायंकाळी 5 वाजता त्यांनी त्यांच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली. तसेच आत्महत्याग्रस्त युवकाच्या कुटुंबातील व्यक्तींना शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणी देखील केली गेलीये. 


अत्यंसंस्कार न करण्याचा निर्णय


आज पहाटे त्यांनी आत्महत्या केल्याची बाब त्यांचे नातेवाईक आणि गावकऱ्यांना लक्षात आली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात धावपळ करत गोविंद यांचा मृतदेह उपोषण स्थळी आणण्यात आला. आज त्यांचा मृतदेह बोरगाव काळे येथील उपोषण स्थळी ठेवण्यात आलाय.  आजूबाजूच्या अनेक गावातील मराठा आंदोलन यावेळी हजर होते. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. 


प्रशासनाकडून धावपळ


या आंदोलकांची भूमिका लक्षात घेता प्रशासनाकडून देखील तात्काळ धावपळ करण्यात आली. तसेच या उपोषणस्थळी तहसीलदारांना पाठवण्यात आले. यावर चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरु आहे. आजूबाजूच्या गावातील अनेक लोक यावेळी उपोषण स्थळी हजर आहेत. मोठ्या संख्येने आजूबाजूच्या गावातील महिला वर्ग देखील उपोषण स्थळी उपस्थित आहे. त्यामुळे यावर प्रशासन कोणता मार्ग काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


दरम्यान कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीचे निर्देश राज्य सरकारकडून करण्यात आले आहेत. दरम्यान ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात देखील करण्यात आलीये. मनोज जरांगे यांनी त्यांचं उपोषण जरी मागे घेतलं असलं तरीही राज्यभरात साखळी उपोषण सुरुच राहणार आहेत. त्यामुळे सध्या राज्यात अनेक ठिकाणी साखळी उपोषणं सुरु आहेत. 


हेही वाचा : 


Jalgaon News : मराठा बांधवांचा आंदोलनाचा पवित्रा कायम, जळगावमध्ये मराठा कार्यकर्त्यांचे मेहरुन तलावात जलसमाधी आंदोलन