लातूर: मराठा समाजाच्या आरक्षण (Maratha Reservation) लढ्यात राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. ज्या ज्या गावात मराठा समाजाची घरे आहेत त्या त्या गावात राजकीय नेत्याना गावबंदी जाहीर करण्यात आली आहे. मात्र लातूर जिल्ह्यातील जाऊ (Jau Village) या गावात 95 टक्के घरे ही मुस्लिम समाजाची आहेत तर 5 टक्के घरे ही दलित समाजाची आहेत. या गावात मराठा समाजाचे एकही घर नाही. पण तरीही त्या गावाने राजकीय नेत्यांना गावाबंदी केली आहे.


लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील जाऊ हे गाव. 95 टक्के घरे ही मुस्लिम समाजाची आहेत. दोन हजार लोकसंख्येच्या या गावात 160 घरे आहेत. त्यापैकी 15 घरे ही दलित समाजाची आहेत. उर्वरित घरे ही मुस्लिम समाजाची आहेत. निलंगा शहराच्या जवळच असणारे हे गाव. या गावात आज सकाळी बैठक झाली. सात ग्रामपंचायत सदस्य, आठवा सरपंच आणि गावातील तरुण या बैठकीला उपस्थित होते. 


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभरात जे आंदोलन उभे राहिलं आहे त्या आंदोलनाला आपणही पाठिंबा द्यावा असा विचार पुढे आला. या विचारातूनच मग मराठा आरक्षण आंदोलनाला संपूर्ण गावानं जाहीर पाठिंबा दिला आहे. विषय एवढ्यावरच संपला नाही तर जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावामध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी पण जाहीर करण्यात आली आहे.


जाऊ गावचे सरपंच सोहेल शेख यांनी एबीपी माझाशी बोलताना सागितले की, "गावागावात सध्या या आंदोलनाला पाठिंबा देणे सुरू असून काही गावांत साखळी उपोषण तर काही गावात पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी जाऊ येथील समस्त गावकऱ्यांनी बैठक घेण्यात आली. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. गावात मराठा समाजाचे घर नसलं म्हणून काय झालं, आमचे अनेक व्यवहार तर मराठा कुटुंबांशी आहेत. त्याच्या या लढ्यात भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत."


मराठा समाजातील गरिब आणि अर्थिकदृष्ट्या दूर्बल तरूणांना शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण मिळणे गरजेचे असून यासाठी चाललेले हे आंदोलनाला आपलाही हातभार असला पाहीजे या व्यापक विचारातून जाऊ या गावातील नागरिकांनी एकत्र येत हा निर्णय घेतला आहे. त्या स्वरूपाचा बॅनर त्यांनी गावाच्या प्रवेशद्वारावरच लावला आहे. हे बॅनर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत.
     
ही बातमी वाचा: