लातूर : स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ आणि गव्हाच्या प्रत्येक पोत्यामागे एक ते तीन किलोची चोरी होत असल्याचं लातूरमध्ये (Latur Corruption) उघड झालं आहे. हा घोळ उघडकीस आणणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना या प्रकरणातील दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या आंदोलन करावं लागलं. मनसेच्या आंदोलनानंतर प्रशासनानं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. या निमित्ताने लातूर जिल्ह्यातील जळकोट धान्य गोदामातील घोटाळा चव्हाट्यावर आला आहे. 


पाच वर्षापूर्वी नांदेड एमआयडीसी भागातील कृष्णूर येथील रेशन धान्य घोटाळा संपूर्ण महाराष्ट्रात चांगलाच गाजला होता. त्या प्रकरणात 19 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यापासून कंत्राटदारापर्यंत यामध्ये समावेश होता. काहीशा अशाच स्वरूपाचा गुन्हा आता लातूरमध्ये उघडकीस आला आहे. 


पोत्यामागे एक ते तीन किलोंचा भ्रष्टाचार 


जळकोट येथील धान्य गोदामातून विविध स्वस्त धान्य दुकानावर जाणाऱ्या धान्याची मोजणी केली असता प्रत्येक पोत्यामागे दोन ते तीन किलो धान्य कमी आल्याचे उघडकिस आले आहे. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठपुरावा केल्यानंतर संबंधित कंत्राटदारावर जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र या घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या पुरवठा विभागातील अधिकारी नामानिराळे राहिल्याचे चित्र निर्माण झालंय.


सातत्याने तक्रारी, मात्र कारवाई नाही 


पाच वर्षांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील कृष्णूर एमआयडीसी मधील धान्य घोटाळा राज्यभर गाजला होता. या प्रकरणातील जिल्हा पुरवठा अधिकारी तब्बल अडीच ते तीन वर्ष फरार होते. जिल्हा पुरवठा अधिकारी, गोदामपाल, कंत्राटदार, वाहतूक कंत्राटदार आणि स्वस्त धान्य दुकानदार यांच्या संगनमताने शासकीय धान्य गोदामात कायमच अनागोंदी कारभार चालत असतो. याबाबत सातत्याने तक्रारी येत असतात मात्र त्यावर योग्य ती कारवाई होताना दिसत नाही.


अचानक तपासणी केली असता घोटाळा उघड


या सर्व बाबी लक्षात घेऊन लातूर जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जळकोट येथील धान्य गोदामातून बाहेर पडणाऱ्या वाहनाला अडवलं. त्यातील तांदळाच्या आणि गव्हाच्या पोत्याचे वजन करण्यात आलं. शासकीय नियमानुसार विहीत केलेल्या वजनापेक्षा या पोत्यामध्ये गव्हामध्ये एक किलो ते दीड किलोचा फरक आढळून आला. तर तांदळाच्या पोत्यामध्ये तब्बल अडीच किलो ते तीन किलो कमी धान्य असल्याचा आढळून आलं. मनसेचे कार्यकर्ते यानंतर आक्रमक झाले. संबंधित अधिकारी, गोदामपाल आणि वाहतूकदारावर गुन्हा दाखल करावा या सदर्भात मनसेनं थेट भूमिका घेतली. मात्र प्रशासकीय अधिकारी हालचाल करताना दिसत नव्हते.


मनसेच्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल


गुरूवार सकाळपासून मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वात लातूर जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांनी जळकोट तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यानंतर जळकोटचे तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी प्रशासनाला गुन्हा दाखल करण्यासंदर्भातले आदेश दिले. जळकोट पोलीस ठाण्यात क्रिएटिव्ह ग्रेन्स अँड ट्रान्सपोर्ट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या वाहतूक कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 नुसार जळकोट पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


काय म्हटलंय मनसेने?


मागील तीन ते चार महिन्यापासून आम्ही रीतसर धान्य घोटाळ्याची माहिती लातूरच्या जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे सांगत आहोत. मात्र कोणत्याही स्वरूपाची कारवाई झाली नव्हती. शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कशा स्वरूपाचा भ्रष्ट कारभार सुरू आहे हे दाखवून दिलं. त्यानंतरही गुन्हा दाखल होत नव्हता. यातील दोषी लोकांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी जळकोट तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली. तेव्हा कुठे प्रशासनाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही अतिशय खेदाची बाब असल्याचं मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी सांगितलं.


राज्यभरात प्रत्येक ठिकाणी तीन ते चार किलो धान्य हे पोत्यामधून कमी येत आहे. अधिकारी कंत्राटदार यांची मिलिभगत आहे. यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.


जळकोट पोलीस ठाण्यात संबंधित कंत्राटदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र कंत्राटदाराला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांचे काय हा प्रश्न अनुत्तरित आहे.


ही बातमी वाचा: