लातूर : मागील काही दिवसापासून उन्हाचा कडाका तीव्र वाढला आहे, त्यामुळे विद्युत वापरामध्ये मोठी वाढ झाली आहे. दुपारी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात विद्युत वापर वाढला आहे. अतिरिक्त लोड आल्याने लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आणि नळगीर येथील डीपीला (Electric Transformer) आग लागल्याची घटना घडली आहे. अहमदपूर येथील डीपी रविवारी दुपारी चार ते पाच या वेळेत जळाला. तर नळगीर येथील डीपी संध्याकाळी सात वाजता जळाला. एकाच दिवशी दोन भागातील डीपी जळाल्याने (Latur Electricity) जवळपास 30 गावे ही रविवारी संध्याकाळपासून अंधारात आहेत.


अहमदपूर महावितरणच्या पॉवर ट्रान्सफार्मरला आग 


अहमदपूर येथील महावितरण उपविभागातील शहरासह ग्रामीण भागास विद्युत पुरवठा करणारा एक पॉवर ट्रान्सफार्मरला रविवारी संध्याकाळच्या सुमारास भिषण आग लागली होती. यात विद्युत ट्रान्सफार्मर जळून खाक झाले आहे, त्यात लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. यामुळे शहरासह ग्रामीण भागाचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे.


महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत महावितरण उपविभाग अहमदपूर शहरातील कार्यालयाच्या परिसरातील अर्ध्या शहराला विद्युत पुरवठा करणारा पॉवर ट्रान्सफार्मरला रविवारी संध्याकाळच्या सुमारास भीषण आग लागली होती. अहमदपूर शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागातील गावांचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे.


आगीचे नेमके कारण अद्याप समजले नाही. एक तर रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे मोजकेच अधिकारी, कर्मचारी आपल्या कर्तव्यावर होते. यापैकीच एका अधिकाऱ्याने नगरपालिका अग्नीशमन दलास पाचारण केले होते. शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आली आहे.


सदरील जळून खाक झालेला  पॉवर ट्रान्सफार्मर दुरूस्त होण्यासाठी अयोग्य असल्याने नविन ट्रान्सफार्मर बसवण्यात किती वेळ लागेल याची चिंता शहर वासीयांना भेडसावत आहे .


नळगिरी येथील डीपीला आग अकरा गावी अंधारात


उदगीर तालुक्यातील नळगीर येथील सब स्टेशनमधील मुख्य  डीपीला रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत डीपीचा संपूर्ण नुकसान झालं आहे. यामुळे नळगीर घोंसी पिंपरी नावंदी यासह अकरा गावांचा विद्युत पुरवठा कालपासून खंडित आहे.


नळगीर येथील कनिष्ठ अभियंता राम बिराजदार यांनी सांगितलं की येथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. रविवारपासून विद्युत पुरवठा खंडित आहे. यामुळे दुसऱ्यांकडून विद्युत पुरवठा चालू करून घेण्यासाठी काम चालू आहे. त्यादृष्टीने महावितरण कंपनी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.


रविवारपासून लाईट नसल्याकारणाने सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांची प्रचंड त्रास आणि ओढाताण होत आहे. यातच विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. आज बँकेचे कामही ठप्प आहेत. या भागातला विद्युत पुरवठा तात्काळ सुरू केल्यास सर्वसामान्य नागरिक सुटकेचा श्वास घेतील असे मत या भागातील नागरिक डॉ. शिवराज पाटील यांनी व्यक्त केले आहे.


ही बातमी वाचा: