लातूर: जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था राम भरोसे असल्याचं अनेक घटनांमधून दिसून येतंय. लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Vilasrao Deshmukh Government College Of Latur) रुग्णाच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचं चित्र आहे. या रुग्णालयात चक्क सुरक्षा रक्षक रुग्णांवर उपचार करत असल्याची घटना घडली. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांची सुरक्षारक्षक बरोबर वाद घातला. ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 


शुक्रवारी रात्री लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वाला या गावचे शब्बीर शेख हे अपघातात जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथे आणले असता त्यांना वॉर्ड क्रमांक 27 मध्ये ठेवण्यात आले. या वेळी त्यांना डॉक्टरही तपासून गेले आणि डॉक्टरांनी नर्सला सलाईन आणि इंजेक्शन देण्याचे निर्देश दिले. मात्र नर्सने चक्क सुरक्षा रक्षकाला सलाईन आणि इंजेक्शन देण्यासाठी सांगितलं. 


सुरक्षा रक्षकानेही रुग्णावर उपचार करायला घेतला आणि त्याला रुग्णाच्या नातेवाईकांनी विरोध केला. त्यानंतर सुरक्षा रक्षक आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी घडलेला प्रकार डॉक्टरांच्या कानावर घातला. त्यानंतर डॉक्टरांनी रुग्णावर उपचार करत नर्स आणि सुरक्षा रक्षकाला फैलावर घेतलं. 


ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. सोशल माध्यमातही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील यंत्रणेला जाग आली. आता त्यांनी चौकशी समिती नेमून पुढील कारवाई करणार असल्याची माहिती दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, सदरील प्रकार गंभीर असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. याची तात्काळ चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.


या महाविद्यालयातील रुग्णालयामध्ये पाण्याची योग्य सोय नसून तिसऱ्या माळ्यावरच्या रुग्णांना पाण्यासाठी पहिल्या माळ्यावर यावं लागतंय. तसेच या ठिकाणचे सुरक्षा रक्षक हे उद्धट असल्याची तक्रार अनेकांनी केल्याची माहिती आहे.या ठिकाणी पेशंटच्या नातेवाईकांना सातत्याने मारहाण होत असते. आता तर सुरक्षारक्षकच नर्सच्या मार्गदर्शनाखाली उपचार करत असल्याचं दिसून येतंय. असे अनेक अनागोदी प्रकार सुरू आहेत. 


ही बातमी वाचा: