Latur Congress Agitation : मागील 26 दिवसांपासून लातूर (Latur) जिल्ह्यात जळकोट (Jalkot) तालुक्यात पावसानं उघडीप दिली आहे. पाऊस नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. पाण्याअभावी पिकांचे नुकसान होत आहे. दुसरीकडे अनेक जणांकडे पाण्याची सोय आहे, मात्र वीज पुरवठा नीट होत नसल्यानं हाता-तोंडाशी आलेल्या पिकाला पाणी देता येत नाही. यामुळं जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सरकार दरबारी मांडण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) तिथे आले असता काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं.




नेमके का संतापले मोर्चेकरी ?


मोर्चा तहसील कार्यालय जळकोटकडे निघाला असताना उदगीर जळकोटचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा ताफा तिथे आला. गाडीतून उतरुन बनसोडे मोर्चेकरांना भेटण्यासाठी गेले. त्यावेळेस संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. हमारा नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो... काँग्रेस पक्षाचा विजय असो.. या घोषणावरच कार्यकर्ते थांबले नाहीत तर त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्येचा पाढाच माजी मंत्री बनसोडे यांच्यासमोर वाचायला सुरुवात केलाी. तुमच्या काळात तरी काय वेगळं केलं असा सवाल या शेतकऱ्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना विचारला. यामुळं आल्या-पावलांनी आमदारांना परत जायची वेळ आली.




काय आहेत प्रमुख मागण्या


शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी
वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा
दुष्काळ घोषित करुन शेतकऱ्यांना पुढील पेरणीसाठी निधी मंजूर करावा
नुकसानीचे सरसकट पंचनामे करुन अहवाल शासनास सादर करण्यात यावा


या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसमोरच काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. उदगीर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे हे आमदार आहेत. गेल्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री होते. उदगीर मतदारसंघातील मुख्य शहर म्हणून जळकोट तालुक्याची ओळख आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठीच हा मोर्चा जळकोट तालुका काँग्रेस कमिटीनं आयोजित केला होता. याच ठिकाणावरुन जाताना संजय बनसोडे हे मोर्चेकरांकडे गेले असता  त्यांना मोर्चेकरांच्या रोशाला सामोरं जावं लागलं.


महत्त्वाच्या बातम्या: