Beed Soybean News : सध्या राज्यात काही भागात चांगला पाऊस (Rain) पडत आहे. तर काही ठिकाणी अद्याप शेतकऱ्यांना पावसाची गरज आहे. शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. बीड (Beed) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सध्या पिकं वाचवण्यासाठी पावसाची खूप गरज आहे. पाण्याअभावी सोयाबीनने (Soybean) माना टाकायला सुरुवात केली आहे. ऐन शेंगा भरण्याच्या मोसमात सोयाबीन पिकाला पाणी नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. 


बीड जिल्ह्यात गल्या तीन आठवड्यापासून पाऊस झालेला नाही. त्यामुळं पावसाअभावी पिके करपू लागली आहेत. पावसाअभावी सोयाबीनचे पिक सुकू लागले आहे. चौसाळा येथील वसंत पिंपळे यांनी जून महिन्यात पाऊस पडल्यावर साडेचार एकरावर सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र, पीक ऐन जोमात आल्यावर पावसानं दडी मारली आहे. आता सोयाबीनला शेंगा लागण्याचा काळ आहे, अशातच आता पाण्याअभावी सोयाबीन सुकून चाललं आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. बीड जिल्ह्यातील शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. चौसाळा येथील शीला ताठे यांनी साडेतीन एकरावर सोयाबीनची पेरणी केली होती. सोयाबीनची मशागत करण्यासाठी त्यांचा आत्तापर्यंत मोठा खर्च झाला आहे. सोयाबीन हिरवं गार होतं त्यामुळे दोन पैसे मिळतील अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र पावसाचा मोठा खंड पडला आणि या कोरडवाहू जमिनीतली पिकं माना टाकू लागली आहेत. त्यामुळं त्यांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.




बीड जिल्ह्यात सध्या सोयाबीनची शेती हिरवी दिसत असली तरी ज्या काळात सोयाबीनला पाण्याची गरज आहे, त्याच काळात पाऊस गायब झाला आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर सोयाबीनच्या पिकाने माना टाकायला सुरुवात केली आहे. फुलं आणि शेंगा लागण्यासाठी सोयाबीनला पाण्याची आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. ही अवस्था एकट्या सोयाबीन पिकाची नाही तर कापसाची देखील आहे. पाण्याअभावी कापसाची वाढ खुंटली आहे. ज्या काळात कापसाला फुलं लागायला पाहिजे होती तिथे मात्र पाणी मिळत नसल्याने अनेक रोगांचा प्रादुर्भाव कापसावर होऊ लागला आहे. 




दरम्यान, गेल्यावर्षी परतीच्या पावसामुळं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं होतं. यावर्षी पाऊस नसल्याने मोठं नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. दरम्यान, नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करत आहेत. यावर्षी सुरुवातीला मान्सूनने जोरदार हजेरी लावली होती. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पहिल्याच पावसाने धुमाकूल घातला होता. मराठवाड्यातही या पावसाने सुरुवातीच्या काळात दिलासा दिला होता. मात्र, आता ज्यावेळी पिके भरात आहेत त्याच काळात पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांची चिंता दिवसागणिक वाढू लागली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: