Latur Earthquake : लातूर जिल्ह्यातील किल्लारी (killari) येथे 29 वर्षापूर्वी म्हणजेच 30 सप्टेंबर 1993 रोजी झालेल्या भूकंपातील (Earthquake) मृतांना आज जिल्ह्यात अभिवादन करण्यात आले. दर वर्षी आजच्या दिवशी हा कार्यक्रम पार पडत असतो. पोलिस दलाकडून बंदुकीच्या फैरी झाडत भूकंपात प्राण गमावलेल्या लोकांना अभिवादन करण्यात आले. यावेळी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण केले. औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार हे ही यावेळी उपस्थित होते.
भूकंप झालेल्या गावातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज समाधान शिबिराचे देखील आयोजित करण्यात आलं होतं. लातूर जिल्ह्यातील भूकंपग्रस्त 38 गावातील नागरिकांनी आज या ठिकाणी उपस्थिती लावली होती. प्रशासनातील अनेक उच्च पदस्थ अधिकारी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्या समोरच हे प्रश्न मार्गी लावण्याच्या अनुषंगाने काम करण्यात आलं.
लातूरकर आजही विसरले नाहीत तो दिवस
लातूर हे नाव जरी घेतले तर आज देखील 30 सप्टेंबर 1993 चा तो दिवस आठवतो. 29 वर्षापूर्वी याच दिवशी लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे 6.4 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला आणि काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले. 52 खेडेगावातील तीस हजाराच्या आसपास घरे आणि आधारभूत सोयीसुविधा कायमच्या नष्ट झाल्या. या धक्क्यात आठ हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर सोळा हजारापेक्षा जास्त लोक जखमी झाले. पंधरा हजारा पेक्षा जास्त जणावरांचा मृत्यू झाला होता. या भूकंपाचा फटका येथेच नव्हे तर राज्यातील अकरा जिल्ह्यांना बसला. भूकंपामुळे तब्बल अकराशे कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते.
एका धक्क्याने 52 गावांचा इतिहास बदलला
29 वर्षांपूर्वी घडलेल्या या एका घटनेने 52 गावांचा इतिहास बदलून गेला. आजही लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 52 गावात भूकंपाच्या खुणा आहेत. या गावांचे नवीन जागेत पुर्नवसन करण्यात आहे. मात्र जुन्या गावाच्या जखमा आजही दर 30 सप्टेंबरला पुन्हा भळभळतात. त्यानिमित्तानेच आज किल्लारी येथे भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
पुनर्वसनासाठी 1200 कोटी रूपयांचा खर्च
किल्लारीमध्ये भूकंप येऊन गेल्यानंतर या भागात अनेक आपत्ती व्यवस्थापनचे काम दिवस सुरु होते. राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून मदतीचा ओघ सुरु होता. ही तात्पुरती मदत येत होती. मात्र या भागातील लोकांचे कायमचे पुनर्वसन करण्यासाठी प्रशासन कामाला लागले होते. तत्कालीन महाराष्ट्र सरकारने या भागातील भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन करावे हा उद्देश समोर ठेवून संपूर्ण गावे विकसित करण्याचा निर्णय घेतला. बाधित गावांची गरज लक्षात घेऊन गावासाठी जमीन संपादित करण्यापासून सुरुवात झाली. 52 गावांचे पुनर्वसन करण्याच्या या प्रकल्पावर 1200 कोटी रूपयांचा खर्च होता. जागतिक बँकेची या प्रकल्पच्या खर्चावर देखरेख होती. पूर्ण गाव वसवणे ही अशा प्रकारचा देशातील हा पहिलाचा प्रकल्प होता. यात 52 गावांचे स्थालांतर आणि पुर्नवसन होणार होते. त्यामध्ये 23 हजार नवीन घरे बांधणे, विविध संस्था आणि देणगीदार यांच्या सहकार्यातून साडेपाच हजार घरे बांधून घेणे, तीस हजारच्या आसपास घरे आहेत तेथेच बांधून देणे किंवा दुरुस्त करून देणे, यासह तेरा जिल्ह्यातील अडीच हजार गावातील दोन लाखा पेक्षा जास्त घरे दुरुस्ती करणे ही कामे होती.
गावात अनेक सोयीसुविधा
प्रत्यक्षात काम सुरु झाल्यानंतर सर्वात प्रथम संपादित जमिनीवर रस्ते करण्यापासून सुरुवात झाली. मुख्य रस्त्या बरोबर अंतर्गत रस्, नाले, पिण्याच्या पाण्याची सोय, पाईपलाईन, वीज पुरवठा, खेळाचे मैदान, शाळेची इमारत, ग्रामपंचायत, आरोग्य , वाचनालय या सारख्या इमारतींची आखणी आणि बांधणी करत गावातील लोकांच्या नोंदीनुसार घरांचे वाटप करत अनेक टप्ंप्यातून हे पुनर्वसन पार पडले. मात्र ही सर्व घरे बांधताना पुन्हा भूकंप होईल अशी शक्यता लक्षात घेउन भूकंप रोधक घरे बांधण्यात आली आहेत. 29 वर्षंनंतर ही गावे आता सुधारित सरकारी निवासस्थाने वाटतात .
अशा आपत्तींना तोंड देण्याची तयारी म्हणून नवीन गावांची रचना ही विरळ लोकवस्तीची करण्यात आली आहे. किल्लारी सारख्या गावाचे अंतर्गत रस्त्ये हे 64 किलोमीटरचे आहेत. हे गाव तीन भागात वसले आहे . यामुळे गावाचे गावपण हरवले आहे . भूकंप पीडित गावाच्या विकासासाठी शासनाने सर्वातोपरी मदत केली. गावे वसली, पीडितांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात आली, नौकरीत येथील मुलांना सवलत देण्यात आली. कोणत्याही आपत्तीला सामोऱ्या जाणाऱ्या पीडित व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाचा शाश्वत विकास करणे आवश्यक असते हाच उद्देश डोळ्या समोर ठेवून किल्लारी भूकंपातील बाधित गावांचा विकास करण्यात आला. परंतु, येथील बाजारपेठ, सामाजिक आणि आर्थिक स्तर लक्षात घेऊन गावात आम्हाला घरे मिळाली नाहीत अशी ओरड अधून मधून होत असते. गावातील घरे वापरण्या लायक नाहीत, पडायला आली आहेत असे ही काही लाभार्थी सांगतात तक्रार करतात. मात्र हr घरे भूकंप रोधक घरे आहेत. लोकांच्या मनासारखी बांधकामे करता येत नाही हे सांगितले तरी ते आज ही अनेकांच्या लक्षात आले नाही.
या भागातील पुर्नवसनची प्रक्रिया त्याच वेळी पार पडली आहे. मात्र अनेकांनी त्या त्या वेळी आपल्या घरावर ताबा घेतला नाही. गावातील लोकांच्या यादीनुसार घरे वाटण्यात आली आहेत . तीन वर्षापूर्वी फेबुरवारी महिन्यात तीन हजार घरांचे कबाले वाटले आहेत. सरकारच्या धोरणानुसार योग्य लाभार्थ्यांना त्याचे अधिकार मिळवून देण्यात आले आहेत. काही समस्यां असतील तर त्यातून मार्ग काढण्यात आला आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
समस्यांची पर्तता नाही
आज ही गावे आर्थिकदृष्टा सक्षम झाली आहेत. या गावात शेतीला गती देण्यात आली आहे . या भागात पाण्याचे कायमच दुर्भिक्ष राहिले आहे . यातून मार्ग काढण्यासाठी या भागातील अनेक गावात जलयुक्त शिवाराची कामे करण्यात आली आहेत ती ही लोकसहभागातून. किल्लारी, मातोळा , करजगी या गावात लोकसहभागातून कामे झाली आहेत.
आज 29 वर्षा नंतर गावात अनेक समस्यां आहेत. लांबच लांब अंतर्गत रस्ते असल्यामुळे त्याची देखभाल ग्रामपंचायत स्तरावर शक्यच नाही. तीच गत पाणी पुरवठ्याच्या पाईप लाईन आणि पाण्याच्या टाकीची आहे. लांब रस्त्यामुळे रस्त्यावर लागणाऱ्या वीजेच्या दिव्यांची ग्रामपंचायत निधीत दुरुस्तीस परवडत नाही. गावाचा भौतिक विकास त्यावेळी झाला मात्र तो तसा टिकवून ठेवण्यासाठी लागणारा पुढील निधी आता येत नाही. वाढलेली लोकसंख्या,प्रत्यक्षातील गरज याची त्यावेळेस तरतूद करण्यात आलीच नाही.
सरकारी आराखड्यानुसार जरी या गावांचे पुनर्वसन झाले तरी केवळ इमारतीपूरते मर्यादित राहिले. पुनर्वसनानंतरही आपली काही जबाबदारी आहे हे सरकारने आणि प्रशासनाने लक्षात घ्यायला हवे, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. गावाला गावपण देण्यासाठी नागरिकांना सोबत घेऊन त्यांनी प्रयत्न करायला हवेत. कारण भूकंपनानंतर नव्या भिंतींनी भेगा जरी भरल्या किंवा बुजल्या असल्या तरी जखमा मात्र आजही ओल्याच आहेत. या भरून निघणे कठीण असले तरी त्याच्यावर मायेची फुंकर घालण्याची गरज आहे.
महत्वाच्या बातम्या