Latur MNS Agitation : लातूर (Latur) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा आणि अनुदान देण्यात यावं या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) वतीने रेणापूर (Renapur) इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावर्षी सततच्या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळं शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालं आहे. सोयाबीन पीक तर अक्षरशः हातचे गेले आहे. तर दुसरीकडं मूग आणि उडीद उगवलाच नाही. त्यामुळं आज आक्रमक पवित्रा घेत मनसेच्या वतीनं शेतकऱ्यांनी सरसकट पीक विमा आणि अनुदान देण्यात याव अशी मागणी करण्यात आली.
मनसेच्या आंदोलनात शेतकरी संघटनांसह शेतकऱ्यांचा सहभाग
सरकारने जे अनुदान आणि पीक विमा दिलेला आहे तो अतिशय कमी क्षेत्रावर आणि काहीच शेतकऱ्यांना दिला होता. नुकसानाची व्याप्ती त्यापेक्षा कैकपटीने अधिक आहे. त्यामुळं सरसकट अनुदान देण्यात यावं अशी मागणी जोर धरत आहे. मात्र, सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष न दिल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना लातूरच्या वतीने रेनापुर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. लातूर, बीड, लातूर आणि परभणी या रस्त्यावर हे आंदोलन करण्यात आले होते. जिल्हाभरातील मनसेचे कार्यकर्ते तसेच विविध शेतकरी संघटना, शेतकरी या वेळेस आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. सरकार जोपर्यंत सरसकट अनुदान देत नाही तोपर्यंत विविध ठिकाणी हे आंदोलन होतच राहणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान, आंदोलनस्थळी दोन्ही बाजूने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता. यातील काही आंदोलकांना पोलिसांनी अटक करुन कारवाई देखील केली आहे.
अतिवृष्टीचा राज्यातील 27 लाख शेतकऱ्यांना फटका
दरम्यान, राज्यात आत्तापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा 24 टक्के अधिक पावसाची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली आहे. दरम्यान, सुरुवातील जून महिन्यात पावसानं उघडीप दिली होती. त्यानंतर मात्र, जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली होती. तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेती पिकं वाया गेली आहेत. तसेच काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी देखील खरवडून गेल्या आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच अनेक भागात पशुधनाचं देखील नुकसान झालं आहे. दरम्यान, राज्य सरकारनं दिलेल्या माहितीनुसार अतिवृष्टीनं राज्यातील 27 लाख शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: