लातूर: भारतीय जनता पक्षाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी मराठा आरक्षणास (Maratha Reservation) जाहीर पाठिंबा दिला आहे. लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावं अशी विनंती करणारा पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं आहे. मराठा आरक्षणाविषयी जाहीर भूमिका घेणारे संभाजी पाटील निलंगेकर हे सत्ताधारी पक्षातील एकमेव आमदार ठरले आहेत.


निलंगा विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी मराठा आरक्षणाविषयी जाहीर भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी पत्र लिहिलं आहे. ते पत्र त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही प्रसिद्ध केलं आहे. सत्ताधारी पक्षातील आमदाराने जाहीर भूमिका घेण्याचं महाराष्ट्रातले एकमेव उदाहरण म्हणजे संभाजी पाटील निलंगेकर यांचा आहे.


काय आहे पत्रात?


मराठा समाज हा महाराष्ट्रातील मुख्य घटक आहे. मराठा समाजाचे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात महत्वपूर्ण योगदान आहे. मराठा समाजाचा मुख्य व्यवसाय हा शेती असून 99 टक्के मराठा समाज अल्पभूधारक आहे. मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगारांची संख्या प्रचंड मोठी आहे. मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे तसेच आरक्षण नसल्यामुळे गरीब मराठा कुटुंबातील मुले शैक्षणिक व नोकरीच्या सुविधांपासून वंचित आहेत. याचा परिणाम मराठा कुटुंबातील आत्महत्यांचे प्रमाण मागील काही काळात वाढले आहे. मराठा समाजाची आजची परिस्थिती लक्षात घेता या समाजाला आरक्षण देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच मी लोकप्रतिनिधी या नात्याने मराठा क्रांती मोर्चाचा सर्व मागण्यांना व मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठींबा देतो व मराठा समाजास त्वरित आरक्षण द्यावे अशी मागणी करतो.


गावागावात पुढाऱ्यांना गावबंदी


राज्यभरात ज्या पद्धतीने आंदोलनाची गती वाढली आहे त्यानुसार अनेक गावात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी जाहीर करण्यात आली आहे. ठिकठिकाणी गावाच्या प्रवेशद्वारावर सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांना गावबंदीचे बॅनर झळकतना दिसत आहेत. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या गाडीवर दगडफेकी करण्यात आलेली आहे. राजकीय नेत्यांच्या गाड्या अडवण्याचा प्रकार ही घडले आहेत. यामुळे राजकीय नेत्यांना बाहेर पडताना अनेक वेळा विचार करावा लागत आहे. मात्र संभाजी पाटील निलंगेकर यांनी आरक्षणाला जाहीर पाठिंबा देत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.


ही बातमी वाचा: