Latur News:  राज्यातील नावाजलेल्या कृषी बाजार समितीपैकी एक असलेली लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीची (Latur APMC Election) निवडणूक आता रंगात आली आहे. काँग्रेसला (Congress) सुकर असणारी निवडणूक आता अटीतटीची होणार असल्याची चिन्हे आहेत. भाजपातील (BJP) दोन गट एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची स्थिती निर्माण झाल्याने काँग्रेस समोरची आव्हाने वाढली आहेत.


सोयाबीन आणि डाळीचे राज्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक आहे. सोयाबीन, तूर, डाळ यासारख्या शेतमालांचा भाव या बाजारपेठेतून ठरत असतो. मागील 30 वर्षापासून देशमुख यांची एक हाती सत्ता कृषी उत्पन्न बाजार समितीवर राहिली आहे. देशमुख यांनी उमेदवार द्यावा आणि तो  निवडून यावा या परंपरेला गत निवडणुकीत छेद बसला होता. 18 संचालकांपैकी नऊ संचालक हे देशमुख समर्थक होते. पाच संचालक भाजपाचे होते आणि चार संचालकांचा निकाल न्यायप्रविष्ठ होता. 
      


भाजपात दुफळी


माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांना डावलून भाजपाचे पॅनल तयार केले होते. त्यास माजी पालकमंत्री संभाजी पाटील यांचा पाठिंबा होता. यामुळे याची सर्व माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांनी पक्षश्रेष्ठींना देत भाजपाचे दुसरे पॅनल उभे  केलं. त्यास जिल्हाभरातून मोठा पाठिंबाही मिळाला होता. जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढत असताना पक्षांतर्गत दुफळी सत्तेपासून लांब येणारी आहे याची माहिती कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पातळीवर पोहचवली होती.
         


काँग्रेस विरोधक एक होऊ!


आज भाजपा नेते संभाजी पाटील निलंगेकर आणि शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी पत्रकार परिषद घेत भाजपातला दुफळीचा फायदा काँग्रेसला घेऊ देणार नाहीत. सर्वांना एकत्र करून विकास पॅनलच्या नेतृत्वात निवडणूक लढवली जाईल असे संकेत दिले. यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असला तरी जिल्हाध्यक्ष आणि आमदार रमेश कराड यांच्याकडून अद्यापही काय भूमिका घेतली जाणार याबाबत स्पष्टता आली नाही.


देशमुख यांची एकाधिकारशाही


मागील अनेक वर्षापासून देशमुख यांच्याकडेच कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार राहिला आहे. काँग्रेसमध्ये त्यांनी दिलेले उमेदवारच हे अंतिम असतात. सातत्याने जुन्या चेहऱ्यांना संधी देत त्यांनी एक हाती सत्ता कायम ठेवली आहे. या वेळेस काँग्रेस मधील नाराजांची संख्या अधिक असल्याने ही निवडणूक काँग्रेससाठीही सोपी असणार नाही. पक्षांतर्गत नाराजी दूर करत भाजपाची टक्कर देणे हीच देशमुखासमोरची मोठी अडचण असणार आहे.


लातूर ग्रामीणची लिटमस टेस्ट कृषी उत्पन्न बाजार समितीत


लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात तीन वेळेस रमेश आत्ता कराड यांनी आपलं नशिब आजमावले होते. प्रत्येक वेळी देशमुख यांनी त्यांच्यावर मातच केली आहे. विधानसभेची निवडणूक लढवून जिंकून येणं हेच ध्येय रमेश कराड यांनी समोर ठेवले आहे. विधान परिषदेवर ते आमदार असतानासुद्धा त्यांना लातूर ग्रामीण मधून विधानसभेची निवडणूक लढवायचीच आहे. त्याची तयारी त्याच प्रकारे सुरू आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी सगळं लक्ष लातूर ग्रामीणवरच ठेवलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक हा त्यातलाच एक भाग आहे. याबाबतची सर्व कल्पना देशमुख यांनाही असल्याने त्यांनीही मोठ्या प्रमाणात मोर्चे बांधणी केलेली पाहावयास मिळत आहे. भाजपाचा वरिष्ठ पातळीवरून रमेश कराड यांना पुढे जाण्याचे संकेत मिळाल्याने ते सर्व शक्तीने मैदानात उतरले आहेत. त्यातच भाजपातील संभाजी पाटील यांच्या गटाने एक पाऊल मागे जात भाजपाचे एकच पॅनल असेल असे सांगत रमेश कराड यांना साथ देण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे निवडणुकीत रंगत वाढली आहे.