Latur News :  लातूर जिल्ह्यातील (Latur) एका तरुणाला लिफ्ट घेणे जीवावर बेतलं आहे. शेताकडून घरी परतण्यासाठी दुचाकीवर लिफ्ट घेऊन निघालेल्या तरुणाचे अपघाती निधन (Death In Accident) झाला आहे. पाठीमागून कारने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकी 40 ते 50 फुट लांब फरपटत गेली. या भीषण अपघातात लिफ्ट घेणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कार मधील दोन आणि दुचाकी वरील एक जण गंभीर जखमी झाले आहेत. वेळ अमावस्येच्या दिवशी झालेल्या या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


आज लातूर जिल्ह्यात वेळ अमावस्येचा सण उत्साहात साजरा करण्यात आला होता. दिवसभर शेतामध्ये वनभोजनाचा आनंद घेतल्यानंतर संध्याकाळी घराकडे परतणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली होती. अनेकांना संध्याकाळी आपापल्या गावाकडे परतण्याचे वेध लागले होते. पानचिंचोली येथील रहिवासी असलेला शिवकुमार कांबळे निलंगा येथील मित्राच्या शेतातून घराकडे परतत होता. स्वतः जवळची गाडी त्यांनी आपल्या भावाला दिली होती. रस्त्यावर उभा राहून त्याने एका कडून लिफ्ट घेतली होती. लातूर येथील कुलदीप सूर्यवंशी नावाच्या तरुणांना शिवकुमार कांबळे यांना लिफ्ट दिली होती. निलंगा कडून तो लामजना मार्गे औसाकडे येत होता. यावेळेला पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेने 40 ते 50 फूट अंतरापर्यंत दुचाकी कार बरोबर फरफटत गेली होती. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला शिवकुमार कांबळे याचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकी चालवणारा तरुण कुलदीप सूर्यवंशी गंभीर जखमी झाला आहे. कारमधील एअर बॅग उघडल्यानंतर ही त्यातील दोन प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे.


घटनेची माहिती पोलिसांना कळल्यानंतर घटनास्थळी तात्काळ रुग्णवाहिका पाठवून जखमींना उपचारासाठी लातूरला हलवण्यात आलं आहे. शिवकुमार कांबळे हा लातूर येथे रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करत होता. शिवकुमार कांबळे यांचे आईवडील पान चिंचोली येथे मोलमजुरीचे काम करतात.


वेळ अमावस्या म्हणजे काय?


पेरणीनंतरची सातवी अमावस्या म्हणजे वेळ अमावस्या. जूनमध्ये पेरणी होते, सातवी अमावस्या डिसेबंर अखेरीस किंवा जानेवारीच्या पंधरवाड्यात येते. खरीपातील केवळ तुरीची रास होणे बाकी असते, तुरही ऐन बहरात असते. रब्बी हंगामातील पेरणी होऊन संपूर्ण शेत हिरवेगार झालेले असते. ऊनाची तीव्रता नसते. वेळ अमावस्येच्या काळात लातूर सारख्या शहरी भागात तर कर्फ्यु सारखे वातावरण रस्त्यावर दिसते. 


लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील कृषी संस्कृतीत ही वेळ अमावस्येच्या दिवशीची पूजा महत्त्वाची मानली जाते.  या दिवशी शेतात कडब्याचे कोप करून शेतातल्या लक्ष्मीची पूजा मांडली जाते, शेतात खरीप आणि रब्बी या दोन हंगामात मिळून वेळ अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते, या दिवशी मातीच्या लक्ष्मीची मूर्ती तयार केली जाते. कडब्याच्या कोपात लक्ष्मीची प्रतिष्ठापना करतात, यथासांग पूजा केली जाते, शेतातील पांडवांना नवा रंग दिला जातो, रब्बी हंगामातील गहु, हरबरा, ज्वारी, करडई, सुर्यफुल आदी पिकांत चर शिंपून 'रब्बीचा हंगाम चांगला होऊ दे' अशी प्रार्थना केली जाते.