Vel Amavasya 2024 Latur News : भारतासारख्या कृषीप्रधान देशात कृषीशी निगडित अनेक सणवार असतात. असाच एक सण म्हणजे वेळ अमावस्या. शेतातील काळ्या आईची ऋण फेडण्यासाठी आज तिची मनोभावे पूजा केली जाते. आज गावातील सर्व लहान थोर शेतात वन भोजनाचा आनंद लुटताना दिसत आहेत. आज लातूर (Latur) शहरात जणू अघोषित संचारबंदी लागल्या सारखी स्थिती दिसत आहे. बैलपोळा आणि वेळअमावस्या हे सण शेतक­यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे समजले जातात. बैलपोळया दिवशी ज्याच्या जीवावर शेती चालते, त्या बैलांना खाऊपिऊ घालून पुजा केली जाते तर वेळ अमावस्येच्या दिवशी ज्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालतो, त्या काळया आईची पूजा केली जाते. 

Continues below advertisement


शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा दिवस


लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील कृषी संस्कृतीत ही वेळ अमावस्येच्या दिवशीची पूजा महत्त्वाची मानली जाते.  या दिवशी शेतात कडब्याचे कोप करून शेतातल्या लक्ष्मीची पूजा मांडली जाते, शेतात खरीप आणि रब्बी या दोन हंगामात मिळून वेळ अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते, या दिवशी मातीच्या लक्ष्मीची मूर्ती तयार केली जाते. कडब्याच्या कोपात लक्ष्मीची प्रतिष्ठापना करतात, यथासांग पूजा केली जाते, शेतातील पांडवांना नवा रंग दिला जातो, रब्बी हंगामातील गहु, हरबरा, ज्वारी, करडई, सुर्यफुल आदी पिकांत चर शिंपून 'रब्बीचा हंगाम चांगला होऊ दे' अशी प्रार्थना केली जाते. 


वेळ अमावस्या म्हणजे काय?


पेरणीनंतरची सातवी अमावस्या म्हणजे वेळ अमावस्या. जूनमध्ये पेरणी होते, सातवी अमावस्या डिसेबंर अखेरीस किंवा जानेवारीच्या पंधरवाड्यात येते. खरीपातील केवळ तुरीची रास होणे बाकी असते, तुरही ऐन बहरात असते. रब्बी हंगामातील पेरणी होऊन संपूर्ण शेत हिरवेगार झालेले असते. ऊनाची तीव्रता नसते. वेळ अमावस्येच्या काळात लातूर सारख्या शहरी भागात तर कर्फ्यु सारखे वातावरण रस्त्यावर दिसते. आपल्यापेक्षा कोणीतरी अज्ञात शक्ती मोठी आहे.  त्यासमोर वर्षातुन एकदा तरी नतमस्तक व्हावे याची शिकवणुक देणारी संस्कृती जोपासायची परंपरा या निमित्ताने पहायला मिळते.



           
वेळ अमावस्यातील मेजवानी 


ऊसाची गाळप सुरू होत असल्यामुळे ऊस खाण्याची हौस भागवता येते. गुळरसाचा आनंद उपभोगता येतो. घरोघरी गौरीपुजनाचे महत्त्व जितके असते, तितकेच महत्त्व शेतात या दिवशीच्या लक्ष्मीपूजनाला असते. रब्बी हंगामातील पेरणी केलेल्या रानात उंडे, अंबीलचा काला तसेच पाण्याचा चर शिंपडला जातो. तोंडातून हर हर महादेव, हर भला असे म्हणत शेतकरी सर्व शेती फिरतो. ज्वारी, बाजरीचे उंडे, सर्व भाज्यांपासून तयार केली जाणारी भाजी, अंबिल या पदार्थांना वेळ अमावस्येच्या दिवशी जेवणात पहिल्या दर्जाचा मान असतो, या व्यतिरिक्त जो तो आपल्या कुवतीप्रमाणे अन्य पदार्थ तयार करतो. नुकताच आलेला वाटाणा, तुरीचे दाणे घालून केलेली भाजी,(भज्जी), तिळगुळ, शेंगदाण्याची गोड पोळी, ज्वारी-बाजरीची भाकरी, धपाटे, भात, ताकाला ज्वारीचे पीठ लावून केलेली आंबील, अशा पदार्थाचा आस्वाद घेण्यात येतो. आंबील, गव्हाची खीर, भज्जी, भाकरी, कुटलेली शेंगदाण्याची चटणी, हिरव्या मिरचीचा ठेसा नंतर बोरं, पेरू, हरबरे असे असंख्य पदार्थ असतात. जेवण्याच्या आधी या रानमेवानेच पोट भरून जाते. या साठी घरातील महिला दोन दिवसापासून तयारी करतात.


 


वेळ अमावस्याचे हिवाळ्यातील महत्त्व 


हिवाळा हा मनाला उत्साह आणि नवचेतना देणारा ऋतु आहे. आयुर्वेदशास्त्रनुसार या ऋतुनुसार घेतला जाणारा आहार शरीराला मानवणारा असतो. शिवाय तब्येत कमविण्यासाठी हिवाळा अत्यंत योग्य काळ आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा ऋतु लाभदायी ठरावा, यासाठी या काळात येणारा भाजीपाला फळे भरपूर खाऊन निरोगी राहण्याचा सल्ला आहार तज्ज्ञ देतात. हिवाळयामध्ये विविध भाज्या तसेच फळांचा आहार घेण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे या ऋतूत प्रचंड भूक लागते तसेच पचन शक्तही चागली कार्यान्वीत होते, हिवाळयात बाजारपेठेमध्ये आलेल्या फळभाज्या खाणे योग्य असते, या काळात त्वचा कोरडी व रूक्ष पडते, कारण शरीराला स्निग्ध पदार्थाची आवश्यकता असते, त्यामुळे या ऋतूत दुध, तुप, दही, लोणी ताक यासारख्या पदार्थाचे मोठया प्रमाणात सेवन करावे. हिवाळयामध्ये शरीराला आतून उब मिळावी, थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी बाजरीची भाकरी तसेच गरम पदार्थाची घरोघरी मेजवानी असते. यामुळे दूरदुरून अनेक जण  लातुरात येतात. 


 


हेही वाचा>>


Special Report Latur Amol Shinde : अमोल शिंदेंच्या कुटुंबाची केविलवाणी अवस्था, नातलगही दुरावले