Latur Rain : राज्याच्या विविध भागात जोरदार पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. काही ठिकाणी या मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, लातूर (Latur) जिल्ह्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं खरीप पिकांना जलसमाधी मिळाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. तब्बल तीन तास सुरु असलेल्या पावसानं सर्वत्र पाणीच पाणी केलं आहे.


पिकं पाण्यात, शेतकरी संकटात


लातूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे. या पावासाचा शेतीच्या पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. निलंगा तालुक्यातील अनेक गावात दुपारनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. सतत तीन तास पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे. यामुळं या भागातील खरीप पिकांना जलसमाधी मिळाली आहे. माकणी थोर, शिरशी, हांगरगा, हलगरा, सावरी, इनामवाडी लांबोटा, गौर आनंदवाडी, अंबुलगा बु, गुराळ यासह अनेक गावात मुसळधार पावसाने हाहाकार घातला आहे. या गावातील शेतशिवार पाण्याखाली गेले आहेत. तसेच या भागातील वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तसेच जमिनी देखील खरवडून गेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानाची मोजदाद करता येणार नाही एवढं नुकसान झालं आहे, त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे.




 
लातूर जिल्ह्यात वीज पडून दोन म्हशींचा मृत्यू


काल सायंकाळी अचानक सुरु झालेल्या पावसामुळं नागरिकांची धावपळ झाली. तसेच शेतातून घरी येणाऱ्या शेतकऱ्यांचे येण्याचे मार्गच बंद झाले होते. कारण, अचानक आलेल्या पावसानं सगळीकडं पाणीच पाणी केलं होतं. रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले होते. निलंगा परिसरात अनेक ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना दोरीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. दरम्यान, लातूर जिल्ह्यात दोन ठिकाणी वीज पडल्याचीदेखील घटना घडली. आनंदवाडी आणि दगडवाडी इथे वीज पडून दोन म्हशींचा मृत्यू झाला आहे.


आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता


हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात येत्या पाच दिवसात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आजपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्र भागात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच मुंबई ठाणे परीसरातही चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, आज कोकणात पावसाचा ऑरेंज  अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रात पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: