Latur News : लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि आमदार रमेश कराड (Ramesh Karad) यांचा एक फोन कॉल व्हायरल होत असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे लातूरमधील धनगर समाज संतप्त झाला असून सोमवारी आंदोलन करण्याचा इशारा दिला. धनगर समाजाच्या उपोषण स्थळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यावे अशी भूमिका आंदोलन करणाऱ्यांची आहे अशी माहिती आमदार रमेश कराड यांनी दिली. त्यावर प्रत्येकाला वाटतं की मंत्र्यांनी आंदोलन स्थळी यावं, पण ते शक्य नाही अशी भूमिका गिरीश महाजन यांनी घेतली. यामुळे लातूर येथील उपोषण स्थळी असलेला धनगर समाज संतप्त झाला आहे. लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना जिल्ह्यात फिरू देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.
काय आहे संभाषण?
आमदार रमेश कराड यांनी गिरीश महाजन यांना लातूरमधील धनगर आंदोलकांचं मत काय आहे हे सांगितलं. त्यावर गिरीश महाजन अधिवेशन सुरू असल्याचं सांगतात. धनगर समाज हा भाजपचा पारंपरिक मतदार असल्याचं रमेश कराड यांनी सांगितलं. उपोषणकर्त्यांची आपण स्वतः उपोषण स्थळी येऊन दखल घ्यावी अशी धनगर समाजाची मागणी असल्याचे देखील सांगण्यात आलं. मात्र यावर गिरीश महाजन यांनी "सध्या प्रत्येकाला वाटतंय कोणीतरी मंत्री येऊन उपोषण सोडवावे, ही प्रथा झाली आहे असं वक्तव्य केलं.
धनगर समाजाला एसटी (ST) मधून आरक्षणाची अंमलबजावणी करा या मागणीसाठी लातूरमध्ये गेल्या 10 दिवसापासून दोन धनगर समाज बांधव अमरण उपोषण करत आहेत. त्या उपोषणाला अनेक नेत्यांनी भेटी देऊन आपला पाठिंबा दिलाय. त्या उपोषणाला आमदार रमेश कराड यांनीही भेट देऊन पाठिंबा दिलाय. यावेळी आमदार रमेश कराड यांनी लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना फोनद्वारे संपर्क करून धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवण्याची मागणी केली होती.
पालकमंत्री गिरीश महाजन आणि आमदार रमेश कराड यांचा संवाद असलेली ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाल्याने आता धनगर समाज आक्रमक झाला आहे. आमच्यासाठी जर पालकमंत्र्यांना वेळ नसेल तर त्यांना लातूर जिल्ह्यात येऊ देणार नसल्याचा इशारा धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला.
ही बातमी वाचा: