परभणी : आपल्या शांतता रॅलीच्या दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी परभणीतून मराठा (Maratha) समाजाला संबोधित केलं. परभणीत जमलेल्या तमाम बांधवांना माझा मानाचा मुजरा म्हणत मनोज जरांगे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. परभणीकरांनी दाखवलेली ताकत सरकारला दिसली पाहिजे, ही शांतता रॅली आहे, दुसरी रॅली निघाल्यावर मग बघू. महाराष्ट्रातील मराठ्यांनी कंबर कसली आहे,  ते दिवस गेलेत आता संघर्ष करायचा आहे, मराठा समाज आता पूर्ण पेटलाय. या सरकारने छगन भुजबळचे (Chhagan Bhujbal) ऐकून मराठ्यांचं वाटोळं केलंय. मराठ्यांनो एक इंचही मागे हटायचे नाही. सरकारने आणि छगन भुजबळने ओबीसींचे नेते आपल्या विरोधात लढायला लावले आहेत, असे जरांगे यांनी म्हटले. जरांगेंनी आपल्या भाषणातून सरकारला इशारा देत फडणवीसांनाही प्रश्न विचारले. तर, मुंबईतून परत आलो ही चूक झाल्याचंही म्हटलं. 


ते आरक्षण असून असे करत आहेत, मग मराठ्यांना आरक्षण नाही मग आम्ही तर काय करायला पाहिजे. तुमचं असून तुम्हाला एवढं करायचंय, आमच्या लेकरांचे तर वाटोळं झालंय. सरकारला परभणीतील नगरीतून सांगतोय, आमचा अंत पाहू नका. एकदा दोरी सुटली तर मग अवघड होईल, मराठा अन् कुणबी एकच आहे ही पहिली मागणी आहे. मराठ्यांच्या मतांचा कचका कसाय हे त्यांना कळलंय, त्यामुळे ते आता नादी लागणार नाहीत, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला सरसकट ओबीसी आरक्षणावरुन इशारा दिलाय.  


57 लाख नोंदी सापडल्या


तुम्ही काळजीच करु नका मी लई खंबीर आहे. मला म्हणतात हे अडाणी आहे, गावठी आहे, या गावठ्याने कसा खुट्टा खुपसलाय.  निघतो का आता छगन भुजबळ, आता येवल्यात लोक म्हणतात पाटील तुम्ही म्हणले तरी आम्ही याला निवडून येऊ देत नाही. 54 लाख नोंदी निघाल्या आहेत, सरकारने तर मला सांगितलंय 57 लाख निघाल्या आहेत. एका नोंदीवर 3 प्रमाणपत्र निघतात. मराठ्यांची मताने ताकत दिसली पाहिजे होती, यांना ताकदीने पाडलं की नाही. आमची मागणी आहे, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, असेही जरांगे यांनी म्हटलं.


तर, आता पुन्हा मुंबई


ज्यांची नोंद निघाली अन् ज्याची नाही निघाली, त्याचीही नोंद घेऊन प्रमाणपत्र द्यायचे. सरसकट प्रमाणपत्र द्या. म्हणूनच, आपल्याला 13 तारखेच्या आता सगेसोयरेची अंमलबजावणी पाहिजे. 13 तारखेपर्यंत नाही झाली की मग.. असे जरांगेंनी म्हणताच लोकांमधून मुंबई-मुंबई असा आवाज आला. त्यावेळी, बघू मग आता मुंबई तर मुंबई, असे जरांगे यांनी म्हटले. मी तुमचं लेकरू आहे मी कुणालाही मॅनेज होत नाही. जी चूक झाली ती झाली, तुमची इच्छा नसताना तुम्हाला मी मुंबईतून माघारी आणले. आता, जर मुंबईला जायची वेळ आली तर तुम्ही म्हणताल तेंव्हाच परत येऊ. मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत 288 ला 288 पाडायचे म्हणजे पाडायचे. 


ओबीसी-मराठ्यांना आवाहन


संपूर्ण महाराष्ट्र परेशान आहे, परभणीत एवढी पब्लिक कशी आली. हिंगोली अन परभणी जिल्हा ताकदीने मराठ्यांच्या मुलांसाठी पाठीमागे उभा राहिला याचे कौतुक करतो. माझ्या बाजुचे जरी फुटले तरी हा मनोज जरांगे कधीही बेईमान होणार नाही. आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही पक्षाचा भेद आणू नका, अशी संधी पुन्हा येणार नाही. मी सरकारला कधीच मॅनेज होणार नाही, एसआयटी झाली, गोळ्या घातल्या तरी हटलो नाही, आता हल्ला होऊ शकतो. गावखेड्यातील मराठ्यांनी ओबीसींच्या लोकांना बिलकुल त्रास द्यायचा नाही, अन् ओबीसी बांधवांनीही मराठ्यांना त्रास देऊ नये. 


ओबीसी नेत्यांवर हल्लाबोल


मराठ्यांनी एकजुटीने मतदान केले तर, आम्हाला जातीवादी ठरवत आहेत. तुम्ही आजपर्यंत एकजुटीने मतदान केलं, आम्ही कधी काही म्हणालो नाहीत. तुम्ही तर कट्टर असताल, तर मी पण आमच्या मराठ्यांसाठी कट्टर आहे, असे म्हणत नाव न घेता ओबीसी नेत्यांवर हल्लाबोलही केला. 


फडणवीसांना जरांगेंचे सवाल


मुख्यमंत्री साहेबांना अन् फडणवीस साहेबांना सांगतो, फडणवीस यांचे एक म्हणणे आहे. आमच्याबद्दल गैरसमाज पसरवण्यात आला, काय गैरसमज आम्ही पसरवला सांगा. सरकार तुमचे होते तेंव्हा पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देतो म्हणाले ते दिले का?. आमच्या आई-बहिणींचे डोके फोडले की नाही, 70 वर्षीय आजीची कंबर मोडलीय हे खरं नाही का?, असे प्रश्न जरांगे यांनी विचारले. 180 जाती आरक्षणात आणल्या गेल्या आता 300 ते 350 जाती झाल्या आहेत. एक माळी समाज टाकला पुन्हा त्यांचे सर्व माळी टाकण्यात आले, सगळा माळी समाज आरक्षणात टाकण्यात आला आहे.  मग कुणबी अन् मराठा एकच आहे ना, काय चूक बोललो सांगा फडणवीससाहेब, असेही जरांगे यांनी म्हटले.  


288 पाडायला शिकलोच आहोत


भुजबळचे ऐकून एकही केस तुम्ही मागे घेतली नाही, मराठा काय चुकीचं बोलतोय. तुम्ही आमच्यासोबत चाल करताय, भाजपमधल्या मराठ्यांच्या नेत्यानं फडणवीस यांच्याकडे जावे अन् आरक्षण द्या म्हणावं. आम्ही तुमच्याविरोधात बोलणार नाही. मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून ओबीसींचे सगळ्या पक्षातील नेते एक झाले आहेत. आता आपण तयार राहावं, आमचे मराठा आरक्षणासाठी कुठल्याही स्तराला जाऊ शकतात. माझं शरीर मला भयंकर त्रास देतंय, उपोषणाने शरीर पार थकलंय. पण, आरक्षण मिळवून गुलाल उधळेपर्यंत मी मागे हटणार नाही. जर आरक्षण दिले नाही तर बैठक घेऊन 288 उभे करायचे का पाडायचे हे ठरवू. परभणीतील जनता पाहून सरकार 13 जुलैच्या आत निर्णय घेईल, असे वाटते. पण, निर्णय नाही झाला तर मग आपण पाडायला तर शिकलो आहोतच, असा इशाराही जरांगेंनी सरकारला दिला.