Shivajirao Kalge Loksabha Candidate : काँग्रेसकडून (Congress) राज्यातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील सात उमेदवारांचा समावेश करण्यात आलाय. यामध्ये नंदुरबारमधून गोवल के पाडवी, अमरावती बलवंत वानखेडे, नांदेड वसंतराव चव्हाण, पुणे रवींद्र धनगेकर (Ravindra Dhangekar), सोलापूर  प्रणिती शिंदे (Praniti Shinde) आणि कोल्हापुरातून शाहू शहाजी छत्रपती आणि लातूरमधून डॉ शिवाजी काळगे (Shivajirao Kalge) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून या यादीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय.


लातूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून नवीन चेहऱ्याला मैदानात उतरविण्याची तयारी सुरु होती. त्यामध्ये  भाई नगराळे यांचे नाव मागे पडत डॉ. शिवाजी काळगे यांचं नाव पुढे आलं होतं. तसेच या शर्यतीत  दलित पँथरचे नेते दिपक केदार हे देखील काँग्रेसकडून निवडणूक लढायला इच्छुक असल्याचं त्यांनी स्वत: घोषित केलं होतं. पण या स्थितीमध्ये काँग्रेसकडून  डॉ.शिवाजी काळगे यांना प्रथम पंसती दिली जाऊ शकते अशी परिस्थिती होती. 


कोण आहेत डॉ शिवाजी काळगे?


  डॉ.शिवाजी बंडाप्पा काळगे हे लातूर जिल्ह्यातील राणी अंकुलगा येथील रहिवासी आहेत. 1969 सालात त्यांचा जन्म झाला आहे. प्राथमिक शिक्षण निलंगा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये घेतले. माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण लातूर येथे झाले आहे.वैद्यकीय शिक्षण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे झालेले आहे. लातूर शहरांमध्ये 1997 पासून त्यांनी नेत्रशल्यचिकित्सक म्हणून काम करायला सुरुवात केली होती. त्यांची पत्नी सविता ही स्त्री रोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे. अनुसूचित जातीत माला जंगम जातीचे असल्यामुळे लातूर राखीव मतदारसंघातून मागील तीन तीन टर्म शिवाजी काळगे हे  निवडणुकीत तिकीट मिळण्यासाठी प्रयत्न करत होते. 


लातूर भाजपाने यापूर्वीच उमेदवार म्हणून विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांचे नाव जाहीर केलं आहे. काँग्रेसकडून या मतदारसंघात कोणतेही नाव समोर आलं नव्हतं. मात्र कालपासून काँग्रेस पक्षातर्फे डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. डॉक्टरांची स्वच्छ प्रतिमा, लिंगायत समाजातील एक चेहरा हाच फायदा राज्यात इतर ठिकाणीही मिळू शकतो हे लक्षात घेऊन डॉक्टर शिवाजी काळगे यांचा नाव पुढे आल्याचं म्हटलं जात आहे. 


काँग्रेसच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा पूर्ण प्रयत्न करणार - शिवाजीराव काळगे


काँग्रेस पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो पात्र ठरवण्याचा पूर्ण प्रयत्न मी करेन. गोरगरिबांचे प्रश्न आणि काँग्रसेची धोरणं राबवण्याचा प्रमाणिक प्रयत्न करेन. लातूरकरांच्या पाणी प्रश्नावर धडपड करण्याचा प्रयत्न मी करेन. तसेच लातूरमधील बेरोजगारांच्या प्रश्नावरही मी काम करेन, अशी प्रतिक्रिया शिवाजीराव काळगे यांनी एबीपी माझासोबत बोलताना दिली. 


ही बातमी वाचा : 


First list of Congress announced : काँग्रेसची राज्यातील पहिली यादी जाहीर; कोल्हापुरातून शाहू महाराज, पुण्यातून रविंद्र धंगेकर रिंगणात