लातूर: संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशात लातूर हे शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाते.  लातूर (latur News) येथील विद्यार्थ्यावर येथील शिक्षकाचा विशेष प्रभाव आहे. शिक्षक जर विद्यार्थी प्रिय असेल तर  दोन अडीच वर्षे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तो शिक्षक जीव की प्राण असतो. अशाच एका विद्यार्थीप्रिय प्राध्यापकाच्या मृत्यूमुळे अनेक विद्यार्थी अक्षरश: हादरून गेले आहेत. मध्यरात्रीनंतर या विद्यार्थ्यांनी थेट पोलीस ठाणे गाठत शिक्षकाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाईची मागणी केली आहे.


लातूर येथील श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक शैलेंद्र परिहार यांना 18 तारखेला थोडासा ताप आला होता. घराजवळच्या अल्फा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये त्यांनी तपासण्या केल्या. डेंग्यूची लक्षणे असल्या कारणाने त्यांना दवाखान्यात दाखल करून घेण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र काल सकाळपासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी ती खराबच होत गेली. संध्याकाळ नंतर अतिशय खालवलेल्या तब्येतीमुळे त्यांना सोलापुरला हलवण्यासाठी हलचाल सुरू झाली.काही वेळातच त्यांना डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषीत केले.


स्वतःहून दवाखान्यात गेलेले शैलेंद्र परिहार हे काल सकाळपर्यंत उत्तम होते.अचानक प्रकृती खराब होऊन त्यांचा मृत्यू झाल्या कारणाने त्यांचे सहकारी प्राध्यापक कुटुंबीय आणि विद्यार्थी यांना जबरदस्त धक्का बसला.अल्फा हॉस्पिटल प्रशासनाकडे परिहार सर यांना नेमकं काय झालं होते? याबाबत त्यांचे कुटुंबीय आणि सहकाऱ्यांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना सातत्याने उडवाउडवची उत्तर मिळाली. नेमका उपचार काय केला ? रोग काय होता ? अचानक तब्येत का बिघडली ? याच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हॉस्पिटल प्रशासनाने नातेवाईकांना त्यांच्या सहकाऱ्यांना दिली नाही. यामुळे विद्यार्थी प्राध्यापक सहकारी आणि मित्रपरिवार यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठत शिक्षकाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या हॉस्पिटल प्रशासनाकडून सर्व केस पेपर मागून घेऊन त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या वर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे.


 शैलेंद्र परीहार हे मूळचे कानपूरचे रहिवासी. मागील बारा वर्षापासून ते लातूर येथील श्री त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालय इथे कार्यरत आहेत.आई वडील पत्नी आणि दोन वर्षाच्या आतील मुलासह ते लातूर येथेच राहत होते. विद्यार्थी प्रिय असलेले शैलेंद्र परिहार हे फिजिक्स विषय शिकवायचे.अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा विशेष प्रभाव होता.अवघ्या चार दिवसात हसत खेळत असलेले प्राध्यापकांचा अकाली मृत्यू झाल्याने विद्यार्थी त्यांचे सहकारी आणि परिवार ला जबरदस्त धक्का बसला आहे.


 प्राध्यापक शैलेंद्र परिहार यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या हॉस्पिटलवर योग्य ती कारवाई करावी ही मागणी घेऊन विद्यार्थी त्यांचे सहकारी यांनी ॲम्बुलन्स थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन पोलीस अधिकारी तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले. नातेवाईकांकडून माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी शैलेंद्र परिहार यांच्या सहकाऱ्यांना कायदेशीर बाबी समजून सांगितल्या. कानपूर येथे अंत्यसंस्कार करणं आवश्यक असल्या कारणाने मृतदेह मध्यरात्रीच कानपूरकडे रवाना करण्यात आला.ज्या ॲम्बुलन्समधून मृतदेह नेण्यात येत होता त्यापुढे परिहार सर अमर रहे..या घोषणा देत  विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या प्राध्यापकास शेवटचा निरोप दिला आहे. बराच काळ इथे हजर असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी अतिशय शांतपणे स्वतःचं म्हणणं पोलिसांसमोर आपल्या शिक्षकांसमोर मांडलं होतं. शांततेने ते पोलीस ठाण्यात उभे होते.


 संपूर्ण राज्यातून अकरावी बारावीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने गर्दी केली होती.  प्राध्यापकाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या प्रशासनावर कारवाईची मागणी केली.18 तारीख पासून आम्ही रोज त्यांना भेटतोय. स्वतःची गाडी चालवत ते स्वतः दवाखान्यात दाखल झाले होते. 21 तारखेला मध्यरात्रीपर्यंत ते व्यवस्थित होते. 22 तारखेला सकाळपासून दुपारपर्यंत असं काय झालं? ज्यामुळे ते आम्हाला सोडून गेले.याची चौकशी नक्कीच झाली पाहिजे. हॉस्पिटल प्रशासन कोणतीही माहिती द्यायला तयार नाही.अनेक डॉक्टर घडवणारा प्राध्यापक डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे गेला हे अतिशय वाईट आहे, अशी प्रतिक्रिया त्यांचे सहकारी प्राध्यापक मुकेश कुमार यांनी व्यक्त केली आहे