लातूर : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड आणि जालना जिल्ह्यातील मारहाणाची व्हिडिओ व्हायरल (Viral) होत असून सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे. तसेच, भाईगिरी आणि गुंडगिरी वाढत असून स्थानिक नेतेमंडळींच्या कार्यकर्त्यांकडूनच असे वर्तन केल्याचंही यापूर्वी समोर आलं आहे. आता, लातूर शहरातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, पाच लोकांनी एकास भर रस्त्यावर बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली या घटनेने लातूर हादरले आहे. या मारहाणप्रकरणातील जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे. लातूर (Latur) शहर पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथके नेमली आहेत.
     
लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजश्री बारजवळ मारहाणीच्या घटनेचा थरार घडला. बारमधील भांडण रस्त्यावर आलं अन् पाच तरुणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. मारहाण करताना काठी, दगड आणि बेल्ट वापर करण्यात आल्याचे व्हिडिओतून दिसून येते. त्यामुळे, लातूर आंबेजोगाई रस्त्यावर काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. दिवसाढवळ्या अशा पद्धतीची हाणामारी लातूरसाठी नवीन आहे. तिथे हजर असणाऱ्या अनेक लोकांनी या घटनेचे व्हिडिओ स्वताच्या मोबाईलमध्ये शूट केला. त्यानंतर, समाज माध्यमावर हे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. 
      
घटनेची माहिती कळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी तिथे दाखल झाले आहे. तोपर्यंत जखमी व्यक्तीला स्थानिकांनी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही आणि इतर माहिती गोळा केली असून मारहाण करणारे पाचजण हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती आहे. ज्या व्यक्तीला मारहाण झाली तो व्यक्ती हरवाडी येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. लातूर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे आणि गांधी चौक पोलीस ठाण्यातील कर्मचारी आरोपीचा शोध घेत आहेत. पाच लोकांनी एका व्यक्तीला केलेली जबर मारहाण अतिशय भयानक होती, ज्या व्यक्तीला मार लागला आहे त्या व्यक्तीच्या डोक्यात लाथा घालून शिवीगाळ करण्यात आली होती, ही पूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अंबेजोगाई रोडवरील राजश्री बारमध्ये ही लोक दारू पीत बसली होती, बारमध्ये भांडण सुरू झालं तेव्हा या भांडणात बिअरच्या बॉटल मारल्याने भांडण वाढत गेलं. बिअर बारच्या बाहेर आल्यानंतरही भांडण सुरूच होतं. त्यानंतर, ही सर्वजण लातूर-अंबेजोगाई रोडवर आले आणि तेथेच ही बेदम मारहाणीची घटना घडली. 


हेही वाचा


मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!