Amit Deshmukh : मराठवाड्यातील काँग्रेसचे नेते पक्ष सोडून गेलेत मात्र कार्यकर्ते तिथेच आहेत. स्वच्छ प्रतिमा असलेले उमेदवार डॉ. शिवाजी काळगे (Dr Shivaji Kalge) आहेत. कार्यकर्ते हीच भूमिका घेऊन निवडणुकीला सामोरे जातील आणि विजय खेचून आणतील, असा विश्वास अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी व्यक्त केला आहे. लातूरमध्ये (Latur) अमित देशमुख यांनी पहिल्यांदाच कार्यकर्त्यांची संवाद बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. 


अमित देशमुख म्हणाले की, काँग्रेसने पहिल्याच यादीमध्ये लातूर लोकसभेचे उमेदवार डॉ.शिवाजी काळगे असतील असे घोषित केले. तेव्हापासून काँग्रेसने मोठ्या उत्साहाने निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी सुरू केली. गावागावात भेटी होत आहेत. कार्यकर्त्यांचे संवाद शिबिर होत आहेत. डॉ. शिवाजी काळगे यांची स्वच्छ प्रतिमा गावागावात जाऊन सांगण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांची फळी सज्ज आहे. आम्ही सर्व शक्तीनुसार निवडणुकीला सामोरे जात आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. 


त्यांच्या जाण्याने कुठलाही फरक नाही


मराठवाड्यातील दोन नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि बसवराज पाटील मुरूमकर (Basavraj Patil Murumkar) यांचा भाजपात प्रवेश झाला. त्यांच्या जाण्यामुळे असा कोणताही मोठा फरक पडणार नाही. कार्यकर्ते आजही काँग्रेसमध्येच आहेत. हेच कार्यकर्ते म्हणजे शिवाजी काळगे आहेत. त्याच पद्धतीने आम्ही प्रचार यंत्रणा राबवणार आहोत. हे कार्यकर्ते यश नक्कीच खेचून आणतील. 


मनोज जरांगे आणि मराठा समाजाचा भ्रमनिरास


लातूर लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा विषय नक्कीच चर्चेत आहे. मतदानावर त्याचा परिणाम होणारच आहे. मराठा आरक्षणाचा विषय अद्यापही निकाली निघाला नाही. सत्ताधारी पक्षांनी आरक्षण दिल्याचा अविर्भाव निर्माण केला, जल्लोष साजरा केला. मात्र मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि मराठा समाजाचा भ्रमनिरास झाला आहे. काँग्रेसने यापूर्वीच मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) भूमिका जाहीर केली आहे. सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरही आरक्षणाच्या बाजूनेच काँग्रेसची भूमिका असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


वंचितसोबत चर्चा सुरु


वंचित बहुजन आघाडीने गत लोकसभा निवडणुकीत लातूर लोकसभा मतदारसंघात चांगलीच मते घेतली होती. त्यांनी जर काँग्रेसबरोबर आघाडी केली तर त्याचा निश्चित काँग्रेसला फायदा होईल. मात्र अद्याप जागावाटपाच्या चर्चेत सकारात्मक काही होताना दिसत नाही. यावर अमित देशमुख म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीबरोबर सध्या चर्चा सुरू आहे. येत्या काही दिवसांमध्ये तो मार्गही सकारात्मक पद्धतीने पुढे जाईल. याचा फायदा लातूर लोकसभेत निश्चितच होईल.


आमची विजयाची खात्री ही शंभर टक्के


मागील दहा वर्षात काँग्रेसची पिछेहाट झालेली आहे. कधीकाळी हा मतदारसंघ काँग्रेसचा होता. त्या मतदारसंघात काँग्रेसला पुन्हा विजयश्री खेचून आणण्यासाठी अनेक मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे जावे लागेल. हे जरी मान्य केलं तरीही देशातील आजची परिस्थिती खूप बदलून गेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जी जोडतोड करण्यात आलेली आहे . त्यावर सर्वसामान्य मतदारांमध्ये रचंड नाराजी आहे. आता काही सर्व्हे समोर आलेले आहेत. त्यात भाजपासाठी नक्कीच आशादायक चित्र नाही. याचमुळे आमची विजयाची खात्री ही शंभर टक्के आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Mahavikas Aghadi : शरद पवारांचा तडकाफडकी उद्धव ठाकरेंना फोन, मविआत 'या' तीन जागांवरून तिढा कायम