Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात अमानुष खून करून पुरावे नष्ट करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पेठवडगावनजीक अंबप गावात ऊसाच्या शेतामध्ये तरुणाचा विवस्त्र अवस्थेत सडलेला मृतदेह मिळून आल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे. खून करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथम दर्शनी मानले जात आहे. या प्रकरणात पेठवडगाव पोलिस ठाण्यात खून करून पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. दरम्यान, सडलेला मृतदेह सापडल्याने ओळख पटवण्याचे आव्हान वडगाव पोलिसांसमोर आहे.   


अंबप गावातील बुडकी मळा परिसरात शिवकांत पाटील यांच्या शेतामध्ये पाण्याच्या पाटामध्ये अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिस पाटील हरिष गायकवाड यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची ओळख पटवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला, पण पोलिसांना यश आले नाही. 


मारेकऱ्यांनी खून केल्यानंतर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. विवस्त्र स्वरुपात सापडलेल्या मृतदेहाचा काही भाग सडला गेला आहे. त्यामुळे ओळख पटवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. दरम्यान, मृतदेह सीपीआर रूग्णालयात ठेवण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भैरव तळेकर करीत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या