Kolhapur News : नेचर इन निड (बी.एम.डब्ल्यु.टी) सर्व्हिसेस या संस्थेचे महापालिका विरोधातील अपिल जिल्हा न्यायालयाने फेटाळले आहे. तत्कालीन आयुक्तांनी महापालिका कायद्यान्वये नेचर इन निड या संस्थेने करारातील अटी व शर्तीचा भंग केलेने कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
सातारा येथील नेचर इन निड या संस्थेस शहरातील जैव वैद्यकीय कचरा संकलन, वाहतूक व विल्हेवाट प्रकल्प उभारणेसाठी कसबा बावडा ड्रेनेज प्लांट येथील 10,000 चौ. फुट जागा भाडे कराराने देण्यात आली होती. या संस्थेस 20 ऑक्टोबर 2011 रोजी महासभेत या कामाची मान्यता दिलेली होती.
तत्कालीन आयुक्तांनी महापालिका कायद्यानुसार नेचर इन निड या संस्थेने करारातील अटी व शर्तीचा भंग केल्याने व महापालिकेची कायदेशीर देय रॉयल्टी रक्कम 53 लाख 67 हजार थकीत असलेने संस्थेवर कारवाई केली होती. या कारवाईत नेचर इन निडला संस्थेस (बायोमेडिकल वेस्ट मटेरियल) जैव वैद्यकीय कचरा संकलन, वाहतूक व विल्हेवाट प्रकल्पातून बेदखल केले होते. आयुक्तांच्या या आदेशाविरूद्ध नेचर इन निड या संस्थेने कोल्हापूर जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर सुनावणी जिल्हा न्यायाधीश एस.आर.साळुंखे यांचे समोर गुणदोषांवर झाली. मनपाकडून ॲड. प्रफुल्ल राऊत यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी नेचर इन नीड या संस्थेचे अपिल नामंजुर केले. न्यायालयाच्या या आदेशामुळे नेचर इन नीड या संस्थेकडून महापालिकेची देय रक्कम वसूल करण्याचा मार्ग सोयीस्कर झाला असलेचे ॲड.प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. याकामी उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी मार्गदर्शन केले. तर इस्टेट ऑफीसर सचिन जाधव, मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ. विजय पाटील, विधी विभागाचे विलास साळोखे यांनी सहाय्य केले.
इतर महत्वाच्या बातम्या