Samarjit Ghatge Vs Hasan Mushrif : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कागल शहराच्या नगराध्यक्षा सौ. माणिक माळी व त्यांचे पती कागलचे माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे  यांनी त्यांचे भाजपमध्ये कोल्हापुरातील नागाळा पार्कमधील निवासस्थानी स्वागत केले.


माणिक माळी या पाच वर्षांपूर्वी कागल नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्षा म्हणून माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या गटातून नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या आहेत. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुश्रीफ गटातून राजे गटात केलेला प्रवेश म्हणजे मुश्रीफ गटाला मोठा धक्का मानला जात आहे. याआधी मुश्रीफ गटातून राजे गटात माजी नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष आनंदा पसारे,संतोष सोनुले यांनीही प्रवेश केला आहे. कागल शहर हे आमदार हसन मुश्रीफ यांचे होमग्राउंड आहे.


मला कधीही मुश्रीफ गटात स्वातंत्र्य मिळालं नाही 


दरम्यान, राजे गटात प्रवेश केल्यानंतर रमेश माळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 21 वर्षांनी राजे साहेबांच्या घरी परतलो असल्याचे ते म्हणाले. मला भाजपमध्ये प्रवेश करताना कोणताही वाटला नसल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मुश्रीफ गटावर आरोप केला. मला कधीही मुश्रीफ गटात स्वातंत्र्य मिळालं नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. 


कागलमध्ये राजकीय संघर्ष टोकाला 


कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक गटातटाचे राजकारण कागल तालुक्यात होते. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर कोल्हापूरच्या राजकारणाची दिशा बदलून गेली आहे. खासदार संजय मंडलिक यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने कागलच्या राजकारणात मंडलिक आणि समरजितसिंह घाटगे गट एकत्र येण्याची शक्यता आहे.   


दुसरीकडे 2024 मध्ये आमदारकी मिळवाचीच या उद्देशाने समरजित घाटगे यांनी मतदारसंघात व्यूहरचना सुरु केली आहे. त्यांचा आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात राजकीय कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात राजकीय फैरी तसेच मोर्चेही काढले जात आहेत.  


काही दिवसांपूर्वीच समरजित घाटगेंच्या पत्नीचा मुश्रीफ गटाकडून एकेरी उल्लेख झाल्याचा आरोप करत मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर मुश्रीफ गटानेही जोरदार प्रत्युत्तर देत भव्य मोर्चा काढला होता. मुश्रीफांना पाडूनच आमदार होणार असे वक्तव्य समजरजित घाटगे यांनी वक्तव्य केल्यानंतर मुश्रीफ यांनी मला पाडणारा जन्माला  यायचा आहे, असा टोला लगावला होता. त्यानंतर दोन्ही गटाकडून चांगलेच आरोप प्रत्यारोप झाले होते. 



इतर महत्वाच्या बातम्या