कोल्हापूर : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गावरून कोल्हापूरमध्ये सुरु असलेला संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाचे फेर सर्वेक्षण करून कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होणार असल्याची सूचित केलं आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगलीमध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा उद्रेक झाला आहे.
महामार्ग रद्द करण्याचा निर्णय करावा
कोल्हापूरमध्ये शक्तिपीठ महामार्ग विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामधून शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी करण्यात आली होती. आता आमदार सतेजपाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतलेल्या पवित्र्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. शक्तीपीठ महामार्ग स्थगिती आम्हाला मान्य नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. पहिला टप्पा स्थगितीचा असला, तरी दुसरा टप्पा महामार्ग रद्द करण्याचा निर्णय करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये असलेल्या विरोधी भूमिकेमुळे शक्तिपीठ महामार्गावरून कोल्हापूरमध्ये वाद वाढण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे 12 जुलैपर्यंत जर शक्तिपीठ महामार्ग रद्दचा निर्णय झाला नसल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा कोल्हापुरात सर्वपक्षीय शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीकडून देण्यात आला आहे.
हजारो शेतकरी मोर्चाने मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार
दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेर सर्वेक्षणाची भूमिका ट्विटरवरून मांडल्यानंतर कोल्हापूरमध्ये शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे 25 जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये हजारो शेतकरी मोर्चाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाब विचारणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे हजारो शेतकरी मोर्चाने मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार असल्याची माहिती शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे समन्वय गिरीश फोंडे यांनी दिली आहे.
या महामार्गात कोल्हापू जिल्ह्यात बाधित होणारी गावे कोणती आहेत?
- शिरोळ तालुका - कोथळी, दानोळी, निमशिरगाव, तारदाळ
- हातकणंगले तालुका - तिळवणी, साजणी, माणगाव, पट्टणकोडोली,
- करवीर तालुका - सांगवडे, सांगवडेवाडी, हलसवडे, नेर्ली, विकासवाडी, कणेरीवाडी, कणेरी, कोगील बुद्रुक, वडगाव खेबवडे
- कागल तालुका - कागल, व्हनूर, सिद्धनेर्ली, एकोंडी, बामणी, व्हनाळी, कोनवडे, सावर्डे बुद्रुक, सावर्डे खुर्द, सोनाळी कुरणी, निढोरी, व्हनगुत्ती
- भुदरगड तालुका - आदमापूर, वाघापूर, मडिलगे बुद्रुक, कूर, मडिलगे खूर्द निळपण, धारवाड, म्हसवे, गारगोटी, आकुर्डी, पुष्पनगर, सोनारवाडी, मडूर, करडवाडी, शेळोली, वेंगरूळ, सोनुर्ली, मेघोली, नवले, देवर्डे, कारिवडे
- आजरा तालुका - दाभिल, शेळप, पारपोली, आंबाडे, सुळेरान
इतर महत्वाच्या बातम्या