कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या थेट रक्ताचा आणि विचारांचा मी वारसदार आहे. शाहूंचे समतावादी विचार समाजात रूजविण्यासाठी माझे अखंड परिश्रम सुरू आहेत, यामुळे जनतेने मला स्वीकारले तर आहेच, वारसदार म्हणून शिक्कामोर्तब केलं आहे. हिंदू कायद्यानुसार दत्तक प्रक्रिया झाल्याने मी कायदेशीर वारसदार आहे, असे  पत्रक श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी प्रसिद्धीस दिले आहे. पीएम नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या दत्तक विधानाशी संबंधित असलेल्या राजवर्धनसिंह कदमबांडे कोल्हापुरात आले होते. त्यांनी आज बोलताना मी राजर्षी शाहू महाराज यांचा रक्ताचा वारसदार आहे. राजर्षी शाहू महाराज यांचा पणतू आणि प्रिन्स पद्माराजे यांचा चिरंजीव आहे. गादीचे वारसदार खरे की खोटे ही जनता ठरवेल असे त्यांनी म्हटले होते. 

Continues below advertisement


मी राजर्षी शाहूंच्या रक्ताचा, कायद्यानुसार तसेच विचारांचा वारसदार 


या सर्व पार्श्वभूमीवर शाहू छत्रपती यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राजर्षी शाहू महाराजांच्या रक्ताचा वारस म्हणून छत्रपती शहाजी महाराज यांनी मला दत्तक घेतले. त्यामुळे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा आपण कायदेशीर वारसदार झालो आहे. या प्रक्रियेला तत्कालीन महाराष्ट्र सरकारच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू व केंद्रीय गृहमंत्री लाल बहाद्दूर शास्त्री  यांनी 1956 चा हिंदू कायद्यानुसार याला मान्यता देत शिक्कामोर्तब केले.  मी राजर्षी शाहूंच्या रक्ताचा, कायद्यानुसार तसेच विचारांचा वारसदार आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या कन्या राधाबाईसाहेब उर्फ आक्कासाहेब महाराज यांचे चिरंजीव विक्रमसिंह पवार अर्थात छत्रपती शहाजी महाराज यांच्या कन्या शालिनीराजे यांचा मी पूत्र आहे, म्हणजे मी राजर्षी शाहू महाराज यांचा खापर पणतू असल्याने थेट रक्ताचा वारसदार आहे.


मी शाहू विचारांचा वारसदार आहे, याचा मला सार्थ अभिमान 


दत्तक विधानानंतर छत्रपती घराण्याचा मी वारसदार आहेच, पण त्याच बरोबर मी शाहू विचारांचा वारसदार आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. गेल्या साठ वर्षात राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा समतावादी विचार राज्य आणि देशातही पोहोचविण्यासाठी माझे अखंड परिश्रम सुरू आहेत. राजर्षी शाहूंच्या विचारांचा वारस असल्याने जनतेने मला स्वीकारले आहे. कोल्हापूरच्या लोकांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केले,  त्यांच्या या प्रेमामुळेच मी जनतेशी एकरूप झालो आहे. साठ वर्षात जनतेकडून मिळणारे अखंड प्रेम, लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना झालेली विराट गर्दी आणि प्रचाराला मिळत असलेला उस्फूर्त प्रतिसाद पाहता हे सिद्ध होते.


पत्रकात पुढे म्हटले आहे की, ज्या राजर्षी शाहू महाराजांनी आयुष्यभर समतेसाठी, बहुजन समाजाच्या विकासासाठी अहोरात्र कार्य केले. अशा विचारधारेच्या विरोधात राजवर्धन कदमबांडे यांचे काम सुरु आहे, जे स्वत:ला राजर्षी शाहूंच्या विचारांचे वारसदार म्हणवतात, याचे आपल्याला मनस्वी दु:ख होत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या