Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगफुटीसदृश्य पावसाचे रौद्ररुप दिसून येत आहे. आज जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यासह  अनेक गावांना पावसाने झोडपून काढले. तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने हाताला आलेली पिके जाण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रलयकारी पावसाने रेल्वेमार्गावरील अनेक भुयारी मार्गांवर पाणी आल्याने वाहतूक खंडित झाली आहे. हवामान खात्याकडून आणखी चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धडकी भरली आहे. पहाटेपासून सुरु झालेल्या पावसाने सकाळी 10 वाजेपर्यंत झोडपून काढले. 


ढगफुटी सदृश्य पावसाने शिवारात पाणीच पाणी दिसून येत आहे. अनेक रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने अनेक गावातील मार्ग बंद झाले. इचलकरंजी -हातकणंगले मार्गावरील रेल्वेच्या दोन्ही भुयारी मार्गावर पाणी साचल्याने इचलकरंजी पेठवडगाव, पुणे ,मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. रुकडी, तारदाळ, माणगाववाडी रेल्वे भुयारी मार्गखालील वाहतूक बंद झाली आहे.


परतीच्या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनला जबर फटका बसला. पावसाने सोयाबीन भिजल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. आणखीन चार दिवस असाच पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.


दरम्यान, कोल्हापूर शहर परिसरासह जिल्ह्यातही सोमवारी हलका पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत एक फुटाने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील गगनबावडा, आजरा, चंदगड, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यासह अनेक ठिकाणी पाऊस झाला.


बुधवारपर्यंत ‘यलो अलर्ट’ जारी


दुसरीकडे हवामान विभागाने कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांना बुधवारपर्यंत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. 


दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरण त्याच्या एकूण क्षमतेच्या 89.9 टक्के भरले असून 2 हजार 856 क्युसेक विसर्ग दूधगंगा नदीत होत आहे. सातारा जिल्ह्यात सोमवारी कोयना धरण एकूण क्षमतेच्या 99.3 टक्के भरले असले तरी विसर्ग सुरु करण्यात आलेला नाही.


इतर महत्वाच्या बातम्या