Shivaji University Exam : शिवाजी विद्यापीठाच्या (Shivaji University) हिवाळी सत्रातील सर्व विषयांची परीक्षा उद्यापासून सोमवार (6 फेब्रुवारी) पासून नियोजित वेळापत्रकानुसार सुरू करण्याचा निर्णय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने घेतला आहे. दरम्यान, गुरुवार ते शनिवार या तीन दिवशी स्थगित केलेल्या (Kolhapur News) विषयांच्या परीक्षेची तारीख लवकरच कळवण्यात येईल, अशी माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या.


दुसरीकडे, कर्मचाऱ्यांचा संप कायम असून त्यांनी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार घातला आहे. ठोस लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे घेता येणार नाही, असे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. शनिवारी शिवाजी विद्यापीठात विद्यापीठ प्रशासन आणि संयुक्त कृती समितीची  बैठक झाली. या बैठकीमध्ये विद्यापीठ प्रशासनाकडून परीक्षेवरील बहिष्कार मागे घ्यावा, अशी विनंती करण्यात आली. परंतु, हे आंदोलन राज्यभर आहे. संपाचा निर्णय हा राज्य कृती समितीचा असल्याने संप मागे घेण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर होऊ शकत नसल्याचे सांगितले. 


संपामुळे 2 ते 4 फेब्रुवारीला होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली होती. राज्यातील सर्वच विद्यापीठे आणि महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार घालून संप पुकारला. मंत्रालयात कर्मचारी संघटना आणि शासन यांच्यामध्ये चर्चा होऊनही तोडगा निघालेला नाही. शनिवारी (ता. 4 फेब्रुवारी) विभागीय संचालक, कुलगुरू आणि कर्मचारी संघटना यांची बैठक शिवाजी विद्यापीठात पार पडली. जोपर्यंत आमच्या मागण्यांच्या संदर्भात शासन लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही, अशी भूमिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने परीक्षेबाबत कोणताही तोडगा निघाला नाही. 


विद्यार्थ्यांच्या परीक्षा पर्यायी व्यवस्था घेऊन निश्चित कालावधीत पूर्ण कराव्यात, अशी सूचना राज्य सरकारने विद्यापीठ प्रशासनाला केल्याने परीक्षांबाबत ठोस निर्णय घ्यावा लागणार होता. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा आणि मुल्यमापन मंडळाने परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला. सोमवारपासून सर्व विषयांच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार आहेत. तसेच जे पेपर संपामुळे स्थगित केले होते, त्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने कळवले आहे.


महत्वाच्या इतर बातम्या : 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI