India's Largest Chopper Manufacturing Unit : भारतातील सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर कारखान्याचं उद्घाटन पार पडणार आहे. 6 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते कर्नाटकात हा कार्यक्रम पार पडेल. कर्नाटकातील तुमाकुरू येथे हिंदुस्थान एरोनॉटीकल्स लिमिटेड (The Hindustan Aeronautics Limited) म्हणजेच, एचएएलचा (HAL) हेलिकॉप्टर कारखाना सुरू होणार आहे. हा ग्रीनफिल्ड हेलिकॉप्टर कारखाना आहे. यामुळे हेलिकॉप्टर उत्पादन क्षमता आणि इको-सिस्टम वाढवण्यास मदत होईल. संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली की, पुढील 20 वर्षांत येथे 4 लाख कोटींची उलाढाल असलेले 1000 हून अधिक हेलिकॉप्टर बनवले जातील.
'आत्मनिर्भर भारत' मोहिमेला चालना
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या या फॅक्टरीचं लोकार्पण करण्यात येईल. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि संरक्षण मंत्रातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. हा प्रकल्प 615 एकर परिसरात पसरला आहे. या कारखान्यामुळे 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेला चालना मिळेल. तसेच, यामुळे हजारो नागरिकांना रोजगारही मिळेल.
दरवर्षी 30 हेलिकॉप्टर बनवण्यात येणार
या 615 एकरमध्ये परसलेल्या कारखान्यामध्ये सुरुवातीला लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर (LUH) तयार करण्यात येतील. LUH हे स्वदेशी बनावटीचे आणि विकसित केलेले 3-टन श्रेणीचे सिंगल इंजिन हेलिकॉप्टर आहे. सुरुवातीला या कारखान्यात दरवर्षी सुमारे 30 हेलिकॉप्टर बनवण्यात येणार आहेत. त्यानंतर दरवर्षी त्याची क्षमता 60 ते 90 हेलिकॉप्टरपर्यंत वाढवता येईल.
6000 लोकांना मिळणार रोजगार
LUH नंतर येथे लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) आणि इंडियन मल्टीरोल हेलिकॉप्टर (IMRH) तयार करण्याची योजना आहे. याशिवाय एलसीएच, एलयूएच, सिव्हिल एएलएच आणि आयएमआरएचचीही दुरुस्ती केली जाणार आहे. या कारखान्यातून राज्यातील सुमारे 6000 लोकांना रोजगार मिळणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले. याशिवाय कारखाना सुरू झाल्याने आजूबाजूच्या परिसराचाही विकास होणार आहे. 6 फेब्रुवारीलाच पंतप्रधान बेंगळुरूमध्ये इंडिया एनर्जी वीक 2023 चे उद्घाटन करतील. 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान चालणार आहे.
2016 मध्ये प्रकल्पाची पायाभरणी
पंतप्रधान मोदी यांनीच 2016 साली या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. हा देशातील सर्वात मोठा हेलिकॉप्टरचा कारखाना आहे. हे उत्पादन युनिट भारताच्या हेलिकॉप्टर संदर्भातील गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करेल. यामुळे भारताला हेलिकॉप्टर डिझाइन, विकास आणि उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल. हा हेलिकॉप्टर कारखाना इंडस्ट्री 4.0 मानकांनुसार बांधला गेला आहे. पुढील 20 वर्षांमध्ये 3-15 टन श्रेणीतील हजारो हेलिकॉप्टर तयार करण्याची योजना आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :