Kolhapur : कोल्हापूरच्या हद्दवाढीवरून चिंतेत असलेल्या हद्दवाढ विरोधी कृती समितीने केएमटी बंद करा,वैद्यकीय सुविधा बंद करा अशी अरेरावीची भाषा योग्य नसल्याचे म्हटले आहे. आमचा हद्दवाढीला विरोध नाही, पण महापालिकेकडून गावांना काय देणार ते विकास आराखड्याने सांगा अशी मागणी समितीने केली.


कोल्हापूर मनपा प्रशासक डाॅ. कादंबरी बलकवडे यांची हद्दवाढ विरोधी कृती समितीने भेट गावांच्या भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. महापालिका शहरातील नागरिकांना सेवा देऊ शकत नसेल, तर आम्हालाही देऊ शकणार नाही अशी आमची भीती असल्याचे हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या नेत्यांनी व्यक्त केली. आम्ही कोणतीही सुविधा मोफत घेत नाही,  त्यामुळे केएमटी बंद करा, वैद्यकीय सेवा बंद करा अशी भाषा योग्य नाही. शहर आणि ग्रामीण भेदभाव करून भांडणे लावली जात असल्याचे वडणगे सरपंच सचिन चौगले म्हणाले. 


आम्ही भेदभाव करत नाही, महापालिकेने मांडली बाजू 


मनपा प्रशासक कादंबरी बलकवडे तसेच अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई,  नगररचना संचालक आर. सी. महाजन यांनी बाजू मांडली.  महापालिका कोणताही भेदभाव केलेला नाही. कोरोना काळात सर्व प्रकारच्या सेवा दिल्या असल्याचे बलकवडे यांनी सांगितले. स्मशानभूमी, अग्नीशमन सेवाही देत असल्याचे त्यांनी नमूद केले. हद्दवाढीमध्ये आल्यानंतर सुनियोजित विकास करता येईल असेही मनपा अधिकाऱ्यांनी हद्दवाढ विरोधी कृती समितीला सांगितले. 


तर 12 सप्टेंबर केएमटी सक्तीने बंद करू, हद्दवाढ कृती समितीचा इशारा


दरम्यान, कोल्हापूर हद्दवाढ कृती समितीने 12 सप्टेंबरपासून कोल्हापूर महानगरपालिकेने लगतच्या गावांना पुरविण्यात येणारी बससेवा जबरदस्तीने बंद करण्याचा इशारा दिला आहे. अलीकडेच राज्य सरकारने कोल्हापूर महापालिकेकडून हद्दवाढीचा प्रस्ताव मागितल्याने पुन्हा एकदा कार्यकर्ते आणि स्थानिक राजकीय प्रतिनिधींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.


हद्दवाढ कृती समितीने यावेळी टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांना वाहतूक, पाणीपुरवठा यासारख्या सेवा बंद कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. समर्थक कार्यकर्ते बाबा इंदुलकर यांनी म्हटले आहे की, आम्ही हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांमध्ये एकही बस फिरू न देण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गांचे नुकसान होत असतानाही प्रशासनाने बससेवा सुरू ठेवली आहे.