Gokul : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाने (गोकुळ) गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देताना एक महिन्यात दुसऱ्यांदा खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गोकुळकडून गाय दूध खरेदी दरात एक रुपयांची  वाढ करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 11 सप्टेंबरपासून होणार आहे. 


आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत दरवाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती विश्वास पाटील यांनी दिली. 11 सप्टेंबरपासून गाय दूध खरेदी दर 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर रूपये 32 रुपये असा राहील.  सुधारित दरपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थाना पाठवणेत येणार आहेत. 


गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, गोकुळ दूध संघाकडून 1 मार्च 2022 पासून आतापर्यंत गाय दूध खरेदी दरात सरासरी प्रतिलिटर 5 रुपये अशी वाढ करून गाय दूध उत्पादकांना दिलासा देण्याचे काम केले आहे. भविष्यातही गोकुळशी संलग्न दूध उत्पादकांचे हित जोपासण्यासाठी कटिबद्ध आहोत. 


कोरोना संकटाचा मोठा फटका सर्व क्षेत्रांना बसला होता. दूध उत्पादक शेतकऱ्यांना देखील याचा फटका बसला होता. सध्या जनावरांसाठी लागणाऱ्या खाद्यांच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. अशा स्थितीत गोकुळ दूध संघाने दुधाच्या दरात केलेली वाढ शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे.  महागाईच्या काळात दूध दरात झालेली दरवाढीमुळं शेतकऱ्यांना हातभार लागणार आहे.