कोल्हापूर : तुटलेल्या ऊसासाठी 400 रुपये आणि चालू वर्षात 3500 रुपयांसाठी एल्गार पुकारलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आजपासून (23 नोव्हेंबर) पुणे बंगळूर महामार्गावर बेमुदत चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आहे.  राजू शेट्टी यांनी आंदोलनाला प्रारंभ होण्यापूर्वी सांगितले की, शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढत राहणार आहे. आमच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतलं आहे. मात्र, शेतकरी भावांनो मिळेल त्या वाटेने पोलिसांना चुकून महामार्गावर या. अंबाबाईचे दर्शन घेऊन मी महामार्गावर चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळवून दिल्याशिवाय मागे हटणार नाही. चळवळ मोडीत काढण्याचा कारखानदारांचा डाव आहे तो उधळून लावूया. हातामध्ये उसाचा बुडका घ्या आणि लुंग्या-सूनग्यांचा यांचा बंदोबस्त करा. 


सहकार मंत्र्यांसोबत झालेली ऊस दराची बैठक निष्फळ 


दरम्यान, गेल्या हंगामातील प्रतिटन उसाला 100 रुपये साखर कारखान्यांनी आणि एसएसपीअंतर्गत प्रतिटन 300 रुपये शासनाने द्यावेत, हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रस्ताव साखर कारखानदारांनी फेटाळला आहे. त्यामुळे मुंबईत सहकार मंत्र्यांसोबत झालेली ऊस दराची बैठक निष्फळ झाली. त्यामुळे पुणे-बंगळूर महामार्गावर चक्का जाम करण्यात येणार आहे. सरकार आणि साखर कारखानदारांना गुडघे टेकायला लावू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. दरम्यान, कार्यकर्ते रस्त्यावर येऊ नयेत, यासाठी पोलिसांनीही सुद्धा यंत्रणा लावली आहे. 


गतवर्षीच्या उसाला प्रतिटन शंभर रुपये साखर कारखान्यांनी आणि तीनशे रुपये सरकारने द्यावेत, कारखान्यांनी शंभर रुपयांपेक्षा जादा रकमेचा दुसरा हप्ता द्यावा आणि खुशाल साखर कारखाने सुरू करावेत, असे आवाहन शेट्टी यांनी केले; मात्र काही कारखान्यांनी ही रक्कम देण्यासही नकार दिल्याने मुंबई येथे सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत झालेली ऊसदर प्रश्‍नावरील बैठक निष्फळ ठरली. 


इतर महत्वाच्या बातम्या