Kolhapur News : कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातील पंचगंगा नदी प्रदूषण तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीबाबत आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत माजी आमदार अमल महाडिक यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी महाडिक यांनी चार उड्डाणपुलांसाठी आराखडे बनवण्यासाठी सूचना केल्या आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कोल्हापूर शहरातील उड्डाणपुलांचे आराखडे तातडीने सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार महाडिक यांनी या बैठकीत स्थिती जाणून घेतली. महापालिकेच्या (Kolhapur Municipal Corporation) पॅनेलवरील आर्किटेक्ट संदीप गुरव यांनी प्राथमिक आराखड्याचे सादरीकरण केले. 


या बैठकीत शिरोली जकात नाका ते कावळा नाका, दाभोळकर कॉर्नर ते दसरा चौक आणि दसरा चौक ते शिवाजी पूल यासह शिये पूल ते कसबा बावडा अशा चार उड्डाणपुलांचे प्रकल्प आराखडे पाच मार्चपर्यंत तयार करा, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. 22 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करताना रूंदी मोजून भूसंपादनाची गरज असल्यास आराखड्यात नमूद करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. 


महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या उपस्थितीत प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची आज त्यांनी संयुक्त बैठक घेतली. राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित रस्त्यावरील पुलांबरोबरच कावळा नाका ते टेंबलाई उड्डाणपुलापर्यंतही नवीन पूल प्रस्तावित करण्याच्या सूचना केल्या. अमल मडाडिक म्हणाले की, ‘‘एकात्मिक रस्ते प्रकल्पांतर्गंत रुंदीकरण केले असल्याने तावडे हॉटेल ते शिवाजी पुलापर्यंत तीन पूल करता येतील. शिये पूल ते कसबा बावडा हा रस्ता पुरात बंद होऊ नये म्हणून तीनशे मीटर लांबीचा पूल करावा. त्यासाठी तीनही विभागांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करावी. त्यावेळी रूंदी कमी असल्यास कोठे भूसंपादन करावे लागेल, याची माहिती द्यावी. पाच मार्चला सादर करण्यात येणाऱ्या आराखड्यात त्याचा समावेश करावा. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात विद्यापीठजवळील जुना रिंगरोड तसेच नवीन प्रस्तावित केलेल्या रिंगरोडसाठीचे तसेच अंतर्गत रस्त्यांवर चार ठिकाणी उड्डाणपूल करण्याच्यादृष्टीने आराखडे तयार करावेत. 


फुलेवाडी ते उजळाईवाडी हा रस्ताही राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत विस्तारीत केला जावा. त्याकरिता महामार्गाच्या अटी काय आहेत, त्यांची पूर्तता कशापद्धतीने करता येईल, याची माहिती प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी द्यावी. शहरातील आणि परिसरातील ग्रामीण भागातील पुराचा फटका कमी करण्यासाठी शिरोली आणि उचगाव येथील महामार्गाच्या भरीव पुलाऐवजी बॉक्स करण्याचे काम तातडीने करावे.


त्यांनी पुढे सांगितले की, ज्याप्रमाणे गुजरातमधील अहमदाबाद शहरामध्ये सॉलिड वेस्ट कचऱ्याचा वापर राष्ट्रीय महामार्ग बांधणीच्या कामात करण्यात आला आहे, अगदी तसाच सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलेल्या कचऱ्याचा वापर महामार्ग बांधण्यासाठी करण्यात आला, तर कचऱ्याची विल्हेवाट होईल आणि महामार्गासाठी त्याचा वापरही करता येईल. अशा अनेक विषयांसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. 


महत्वाच्या इतर बातम्या :