Kumbhi Sakhar Karkhana Election: अवघ्या जिल्ह्याचे (Kolhapur News) लक्ष लागून राहिलेल्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या रणांगणात विद्यमान अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी चौथ्यांदा बाजी मारली आहे. सत्ताधारी नरके गटाने सर्व 23 जागांवर विजय मिळवत हुकूमत राखली. 15 वर्षांच्या सलग सत्तेनंतर नरके यांना सभासदांनी पुन्हा पाच वर्षांसाठी संधी दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पॅनलने सर्वच्या सर्व 23 जागांवर विजय मिळवला. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. 


कुंभीसाठी माजी आमदार चंद्रदीप नरके विरुद्ध आमदार पी. एन. पाटील समर्थकांमध्ये होता. आजी-माजी आमदारांमध्ये थेट लढत होत असल्याने विशेषतः आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तो चर्चेचा होता. नरके यांच्या विजयाने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे नव्याने आकारला येण्याची चिन्हे आहेत. नरके यांना आमदार सतेज पाटील यांची, तर आमददार पी. एन. पाटील यांना आमदार विनय कोरे यांचे पाठबळ होते. 


मतमोजणीत विरोधी पॅनेलला करवीर तालुक्यासह एकूण 35 गावांमध्ये पहिल्या फेरी सरासरी साडेतीनशे ते चारशे मतांची आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या फेरीत आमदार विनय कोरे आणि गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांच्या मदतीने विरोधकांना पुन्हा पन्हाळा शाहूवाडी तालुक्यात अशाच पद्धतीने आघाडी मिळवता येईल हा विरोधकांचा अंदाज खोडून काढत सत्ताधारी तब्बल 450 ते 600 मतांची आघाडी घेत विजयाकडे वाटचाल सुरू केली. त्यामुळे शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यात आमदार विनय कोरे आणि गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांचा प्रभाव दिसला नाही.


कारखान्यासाठी रविवारी अत्यंत चुरशीने 82.45 टक्के मतदान झाले होते. मंगळवारी शासकीय बहुउद्देशीय रमणमळा येथे 35 टेबलवर मतमोजणी झाली. प्रत्यक्ष साडेनऊच्या सुमारास प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली, ती रात्री उशिरापर्यंत सुरु होती. पहिल्या फेरीत निकाल विरोधकांच्या बाजूने राहिला होता. मात्र, त्यानंतर सत्ताधारी गटाने बाजी पलवटत आघाडी कायम राखली. दोन फेऱ्यांमधील मतमोजणी पार पडल्यानंतर सत्ताधारी नरके गटाने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले होते. 


कुंभी कारखान्यासाठी विद्यमान अध्यक्ष चंद्रदीप नरके यांच्यासह आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, अजित नरके यांनी सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व केले. विरोधी राजश्री शाहू कुंभी बचाव पॅनलचे नेतृत्व आमदार पी. एन. पाटील, चंद्रदीप नरके यांचे चुलते अरुण नरके, गोकुळचे संचालक बाबासाहेब खाडे व चेतन नरके यांनी नेतृत्व केले. या निकालानंतर आता विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. भोगावती कारखान्याचे अध्यक्ष पी. एन. पाटील विरुद्ध माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यात करवीरमध्ये विधानसभेसाठी सामना निश्चित आहे. त्यामुळे या निकालाने चंद्रदीप नरके यांना बळ मिळाल्याचे बोलले जात आहे.


मतपेटीतून सभासदांचा सल्ला


नरके साहेब एका एका व्यक्तीला पंधरा-वीस वर्षे संचालकपद देणे बंद करा, तरुणांना संधी द्या. आमदार पी. एन. पाटील यांनी भोगावती कारखाना सांभाळून गोकुळमधील जुना संचालक तेवढा बदलला पाहिजे. ऊस सोडण्यासाठी एक व्यक्ती आत्महत्या करत होता, तरीही तुम्ही अजून यंत्रणा सुधारली नाही. याचे परिणाम भोगावे लागतील. पुढार्‍यांनो सत्ता येथे जाते लोकांना त्रास देऊन नका, असा सल्लाही कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतपेटीतून मिळाला आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :