Nitin Gadkari : कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वाराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा कोल्हापूर बास्केट ब्रिजची पायाभरणी आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी गडकरी यांनी बास्केट ब्रिजमुळे कितीही पाऊस आला, तरी कोल्हापूरची वाहतूक विस्कळीत होणार नाही, वाहतूक थांबणार नाही अशी ग्वाही दिली. कोल्हापुराला 75 ई-बस मिळवून देण्यासाठी नक्की प्रयत्न करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. नागपुरात मी सासऱ्याचेही घर तोडले, कोल्हापूरला तोडावं लागेल, पुनर्वसन करता येईल, या शहरातील रस्ते मोठे झाले पाहिजेत, शहर सुंदर झालं पाहिजे, मार्केट झालं पाहिजे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. कोल्हापूर देशातील पहिल्या तीन जिल्ह्यात पोहोचेल इतकी ताकद असल्याचेही ते म्हणाले.
मी दिल्लीत गेलो की मला कफ होतो, पण इथं तीन राहिलो, पण कफ झाला नाही. दिल्लीत राहणं म्हणजे आयुष्य कमी केल्यासारखं आहे. त्यामुळे जल, हवा आणि ध्वनिप्रदूषण कमी केलं पाहिजे. यासाठी कोल्हापूरच्या खासदारांनी प्रयत्न करावेत. आपल्याला निरोगी जीवन प्राप्त झालं पाहिजे, असा श्वाश्वत विकास झाला पाहिजे, आणि मग स्मार्ट सिटी होईल. माझ्या विभागाकडून जेवढी मदत करता येईल, तेवढी मी करेन, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांनी सांगली-कोल्हापूर या रस्त्याकडे लक्ष देण्याची मागणी केल्यानंतर हा रस्ता सिमेंट काँक्रिटचा करू, पुढील 50 वर्षे या रस्त्यावर खड्डा पडणार नाही, याची खात्री देतो असे त्यांनी यावेळी सांगितले. सातारा ते कागल या राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणासाठी दोन पॅकेजेस करण्यात आले आहेत. यामधील एक टप्पा अदानी ग्रुपला आणि अन्य एक टप्पा दुसऱ्या ठेकेदाराला गेला आहे. मात्र, त्यांची क्षमता नसल्याचे जाणवते. त्यांनी अन्यही कामे घेतली आहेत.त्यामुळे पुन्हा एकदा व्हेरिफाय करून आपण कामाला लवकरात लवकर सुरुवात करू, असे ते म्हणाले.
नितीन गडकरी पुढे म्हणाले, शिरोळ तालुक्यामध्ये राज्य सरकारची चारशे एकर जागा आहे. ती जागा मिळाल्यास आयात, निर्यात कोल्हापुरातून सुरू होईल. त्यासाठी समुद्र शोधण्याची गरज नाही असेही त्यांनी सांगितले. येथील शेतकऱ्यांना अन्नदातासोबत तुम्ही उर्जादाताही बनवले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. नवनवीन यंत्रणा येत आहे, त्याची माहिती घेतली पाहिजे. खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या भाषणातून कोल्हापूर शहरातील अन्य ज्या ज्या ठिकाणी सध्या उड्डाणपूलाची गरज आहे याची माहिती दिली होती. यावर बोलताना ते म्हणाले की, या संदर्भात जर नगरोत्थान योजनेतून जमीन उपलब्ध करून दिल्यास मी नक्कीच याबाबत विचार करेन, असे सांगितले. महाडिक यांनी जी यादी दिली आहे ती त्याचा डीपीआर बनवण्यास सांगितल्याचेही त्यांनी सांगितले.
महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा, पन्हाळा, जोतिबा या ठिकाणी रोपवे केबल सुरू करण्याची मागणी सुद्धा केली होती. त्या संदर्भात त्यांनी सकारात्मकता दर्शवताना त्यांनी सांगितले की जर पीडब्ल्यूडीकडून प्रस्ताव आल्यास नक्कीच माझ्या मंत्रालयाकडून प्रश्न प्रयत्न केले जातील. पुण्यातील गुंतवणूक कोल्हापूरकडे आणण्याच्या दृष्टीने येथील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. ट्रॅक्टरचे सर्वाधिक पार्ट हे कोल्हापूरमध्ये तयार होतात, तर ट्रॅक्टर का या ठिकाणी बनवत नाही? कोल्हापूरला विकासाच्या दृष्टीने नेण्यासाठी एकत्रित होऊन प्रयत्न करा असे त्यांनी यावेळी आवाहन केले.
इतर महत्वाच्या बातम्या