Hasan Mushrif : ऊसतोडणी मुकादम साखर कारखाने आणि वाहतूकदारांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक करत असल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवून साखर कारखाने आणि वाहतूकदारांची लुबाडणूक थांबवा, अशी मागणी आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी नागपूर अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून केली. लक्षवेधी मांडताना मुश्रीफ म्हणाले की, कोयत्यांच्या संख्येवर मुकादम मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्स घेतो. ही रक्कम तो मजुरांनाही देत नाही. सुशिक्षित बेरोजगार असलेल्या वाहतूकदारांना, तर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. अनेक साखर कारखान्यांची कोट्यावधींची बाकी राहिली आहे. त्यांच्या जिल्ह्यात मुकादमांचे संघटन असल्यामुळे कारखान्यांचे ते काहीही चालू देत नाहीत. उलट त्यांच्या टोळीतला एखादा कामगार आणला तर त्याच्यावरच ते गुन्हा दाखल करतात.


ते पुढे म्हणाले, गोपीनाथजी मुंडे ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळामार्फत ऊसतोड मजुरांची आणि मुकादमांची नोंदणी झाली पाहिजे. त्यासाठी टनाला 10 रुपये कपात केले जातात. महामंडळाच्या माध्यमातून ऊस तोडणी मजुरांना सवलती द्या. कारण कोट्यावधींची लुबाडणूक करून मुकादम अक्षरशः गब्बर झाले आहेत. मुश्रीफ यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना सहकार मंत्री अतुल सावे म्हणाले की, मुश्रीफ यांनी मांडलेली ही परिस्थिती वास्तववादी आहे. मुकादम एका कारखान्याची ॲडव्हान्स बुडवून दुसऱ्या कारखान्याकडे जातो. तिथेही अर्धे काम करून तिसऱ्याच कारखान्याकडे जातो. या संदर्भात लगेच बैठक लावू. ऊस तोडणी कामगार महामंडळामार्फतच पुरवले जातील. यामुळे कुणाचीही फसवणूक होणार नाही.


लम्पी आजाराने दगावलेल्या जनावरांच्या मालकांचे कर्ज माफ करा


दरम्यान, लम्पी आजाराने (Lumpy Skin Disease) दगावलेल्या जनावरांच्या मालकांचे कर्ज माफ करावे, अथवादेण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात यावी अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी नागपूर अधिवेशनात विधान परिषदेत केली आहे. 


सतेज पाटील म्हणाले की, सध्या लम्पी आजारामुळे जनावरे दगावत आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे  नुकसान होत आहे. शासकीय आकडेवारीनुसार 11 हजार जनावरे लम्पी आजाराने दगावली. त्यामुळे दिवसाला सव्वा लाख लिटरचे दुधाचे नुकसान होत आहे. जनावरे दगावल्याने होणारे नुकसान लक्षात घेता त्यापोटी मिळणारी नुकसान भरपाई अत्यंत तुटपुंजी आहे. सध्या देशातील दूध उत्पादन 11 टक्के घट झाली आहे. जनावरांचा भाकडकाळ सुद्धा वाढला आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे आहे. त्यामुळे दगावलेल्या जनावरांच्या मालकांचे कर्ज माफ करावे अथवा त्यापोटी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात यावी. 


इतर महत्वाच्या बातम्या