Kolhapur police : नववर्षाच्या पूर्वसंध्येला ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटनांना आळा घालण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी (kolhapur police) शहरातील सर्व प्रमुख चौकांमध्ये नाकेबंदी सुरू केली आहे. तसेच 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गोव्यातून जिल्ह्यात होणाऱ्या गोवा बनावटीच्या दारूच्या अवैध वाहतुकीवर पोलिस आणि महसूल विभागाचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत.
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले की, “नवीन वर्ष साजरे करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभाग सर्व खबरदारी घेत आहे. गोव्यातून जिल्ह्यात होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीवर अंकुश ठेवण्याबरोबरच सुरक्षित वाहतुकीला प्राधान्य दिले जात आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत.” दरम्यान, जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढत असल्याने पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग आणि कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या इतर मार्गांवर वाहतूक कोंडी वाढत असल्याचे बलकवडे यांनी सांगितले.
दरम्यान, कोयना वन्यजीव अभयारण्य, चांदोली नॅशनल पार्क, राधानगरी वन्यजीव अभयारण्य, सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य या वन परिक्षेत्रातील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करून म्हटले आहे की, वनक्षेत्रात आणि धरणाच्या ठिकाणी होणाऱ्या सेलिब्रेशनमुळे वन्यजीवांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे वन अभयारण्ये आणि परिसरातील पर्यटन स्थळे 30 डिसेंबरपासून तीन दिवस बंद ठेवली जातील. 2 जानेवारीपासून ही ठिकाणे पर्यटकांसाठी खुली होतील. (kolhapur police)
कोल्हापूर पर्यटकांनी गजबजले
दरम्यान, कोल्हापूर शहरात सध्या शाळांना सुट्टी असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे शहरातील वाहतुक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दररोज भाविकांची मोठी गर्दी होत आहे. 1 जानेवारीपर्यंत म्हणजे रविवारपर्यंत ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, गोवा आणि कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी रस्ता वळवण्यात आला आहे. मात्र, वाहतूक सुरळीत करण्यात त्यांचा फारसा फायदा झालेला नाही.
शहर वाहतूक विभागाच्या पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी म्हणाल्या की, “शहरात भाविक, शालेय सहलींसह पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्याने बिंदू चौक, दसरा चौक, छत्रपती शिवाजी चौक, टेंबे रस्ता, मिरजकर तिकटी यासारखे रस्ते आणि प्रमुख चौक, खासबाग मैदान आदी ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी शहरभर वाहतूक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.”
इतर महत्वाच्या बातम्या