Shoumika Mahadik : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आणि तब्बल दोन वर्षांनी होत असलेली गोकुळ सत्तांतरानंतरची पहिलीच सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. ही सभा अत्यंत गोंधळात आणि दोन्ही बाजूने होणाऱ्या घोषणाबाजीमध्ये संपली. या सभेत महाडिक गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी एकहाती किल्ला लढवताना सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मात्र, हे करत असताना गोकुळ अध्यक्ष विश्वास पाटील यांचा एकेरी उल्लेख होत असतानाच व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शौमिका महाडिक यांनी विश्वास पाटील यांची माफी मागितली आहे. 


त्यांनी सोशल मीडियातून पोस्ट करत माफी मागितली आहे. त्यांनी म्हटले आहे की,  सभासदांच्या हितासाठी आम्ही पोट तिडकीने आमचे म्हणणे मांडत होतो. त्यात अनावधानाने माझ्याकडून आबाजींचा एकेरी उल्लेख झाला, असे आजच पाहण्यात आलेल्या एका व्हिडीओच्या माध्यमातून मला समजले. त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते. निश्चितच मी हेतुपूर्वक एकेरी उल्लेख केलेला नव्हता. ते वयाने मोठे आहेत, त्यामुळे मी त्यांचा आदरच करते. पण याचा अर्थ असाही नाही की माझ्या विरोधाची धार कमी होईल. चुकीच्या धोरणांना माझा विरोध कायम राहील. माझ्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचं हित सर्वतोपरी आहे.



गोकुळची आपल्या कार्यकर्त्यांना सभागृहात बसवून सत्ताधाऱ्यांनी खऱ्या सभासदांना बसण्यासाठी जागाच ठेवली नव्हती. याबद्दल विचारणा केली असता त्याकडे दुर्लक्ष केले. आमच्या बर्‍याचश्या प्रश्नांची उत्तरे न देता, आमचे म्हणणे न ऐकता अहवाल वाचन केले. अनेक ठरावांना बहुमताकडून नामंजूरीच्या घोषणा होत असतानाही त्यांनी सपशेल दुर्लक्ष केले. आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहचत नव्हता म्हणून आम्ही माईक वापरला. पण त्याचाही आवाज मा.चेअरमन यांच्यापर्यंत पोहचला नाही. साहजिकच आम्हा सर्वांची सहनशीलता संपली होती. 


शौमिका महाडिकांकडून  समांतर सभा 


दरम्यान, गोकुळ सभेत संचालिका शौमिका महाडिक यांनी  समांतर सभा घेत सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्ला चढवला होता. त्या म्हणाल्या की, आमच्या गटातील ठरावधारकांना जागा दिली नाही, खूर्च्याही रिकाम्या ठेवण्यात आल्या नाहीत. आमचे या सभेतून समाधान झालं नाही. संचालकांना सुद्धा बोलायची परवानगी मिळाली, तर दूध उत्पादकांना काय न्याय देणार? अशी विचारणा त्यांनी केली. 


आमचा माईक बंद करून ठेवण्यात आला. आम्हाला अहवाल नामंजूर आहे, प्रतिप्रश्न विचारू दिले नाहीत, त्यांच्याच लोकांना हातवारे करायला लावले. दिलेली उत्तरे खोटी आणि बनावट आहेत. सत्ता मिळाल्यानंतर खांद्यावरून नाचत आलेल्यांनी सभासदांना दिलेली आश्वासने पूर्ण का केली नाहीत? याचे उत्तर द्यावे. वासाचे दूध परत करण्यापासून ते 4 रूपये दरवाढीची घोषणा केली होती. त्याचे काय झाले अशी विचारणाही शौमिका महाडिक यांनी केली.


इतर महत्वाच्या बातम्या