Gokul Meeting : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आणि तब्बल दोन वर्षांनी होत असलेली गोकुळ सत्तांतरानंतरची पहिलीच सभा अत्यंत गोंधळात आणि दोन्ही बाजूने होणाऱ्या घोषणाबाजीमध्येच संपली. सत्ताधारी गटाकडून शेवटच्या सभासदांचे समाधान होत नाही तोपर्यंत सभा चालवली जाईल, असे सांगण्यात आले होते. तथापि, गोंधळाने पाणी फेरले. सुमारे तासभर चाललेल्या सभेची राष्ट्रगीताने सांगता झाली.  


तत्पूर्वी, कसबा बावड्यातील महासैनिक दरबार हाॅलमध्ये गोकुळची गोंधळामध्येच 60 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेसाठी सत्ताधारी गटाकडून सकाळी आठ वाजल्यापासून ठरावधारक सभासद जमण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सकाळी 11 वाजेपर्यंत सत्ताधाऱ्यांच्या सभासदारांकडून हाॅल व्यापला गेला.


शौमिका महाडिकांकडून विरोधकांना जागा न ठेवल्याचा आरोप


सभागृह भरल्याने आणि शेवटच्या रांगेत बसावे लागणार हे लक्षात येताच विरोधक ठरावधारकांनी घोषणाबाजी सुरु केली. त्याविरोधात सत्ताधारी गटाकडूनही घोषणाबाजी सुरु केली. संचालिका शौमिका महाडिक यांनी  विरोधकांना खूर्च्याही न ठेवल्याचा आरोप करत जिल्ह्यातून आलेल्या ठरावधारकांना जागा न दिल्यास उभारून प्रश्न विचारणार असल्याची भूमिका घेतली. 


घोषणाबाजीमध्येच सभेला सुरुवात


दोन्ही बाजूने घोषणाबाजी सुरु असतानाच शौमिका महाडिक यांचे आगमन झाल्यानंतर सत्ताधारी गटाचे आमदार सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांचे आगमन झाले. सतेज पाटील शौमिका महाडिक यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी भाषण सुरु करताच खाली उभ्या असलेल्या शौमिका महाडिक यांनी न वाचता बोला, सभासदांच्या डोळ्यात डोळे घालून बोला, अशी घोषणाबाजी केली. त्यांनी जोवर उत्पादकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोवर अहवाल वाचन करू नये, अशी भूमिका मांडली. त्यांच्या संपूर्ण भाषणा दरम्यान त्यांनी सातत्याने प्रश्न विचारले, पण गोंधळ प्रचंड असल्याने ते नीट ऐकता नव्हते.  


दुसरीकडे संचालक रणजितसिंह पाटील यांनीही सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले. मात्र, सभेचे कामकाज सुरूच ठेवल्याने अखेर तासाभरानंतर संचालिका शौमिका महाडिक यांनी सभात्याग करत समर्थकांसह बाहेर पडल्या. 


शौमिका महाडिकांकडून समांतर सभा 


संचालिका शौमिका महाडिक यांनी  समांतर सभा घेत सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्ला चढवला. त्या म्हणाल्या की, आमच्या गटातील ठरावधारकांना जागा दिली नाही, खूर्च्याही रिकाम्या ठेवण्यात आल्या नाहीत. आमचे या सभेतून समाधान झालं नाही. संचालकांना सुद्धा बोलायची परवानगी मिळाली, तर दूध उत्पादकांना काय न्याय देणार? अशी विचारणा त्यांनी केली. 
आमचा माईक बंद करून ठेवण्यात आला. आम्हाला अहवाल नामंजूर आहे, प्रतिप्रश्न विचारू दिले नाहीत, त्यांच्याच लोकांना हातवारे करायला लावले. दिलेली उत्तरे खोटी आणि बनावट आहेत. सत्ता मिळाल्यानंतर खांद्यावरून नाचत आलेल्यांनी सभासदांना दिलेली आश्वासने पूर्ण का केली नाहीत? याचे उत्तर द्यावे. वासाचे दूध परत करण्यापासून ते 4 रूपये दरवाढीची घोषणा केली होती. त्याचे काय झाले अशी विचारणाही शौमिका महाडिक यांनी केली.


संघर्ष कायम राहण्याची चिन्हे


आजची सभा गोकुळची असली, तरी त्याला सतेज पाटील आणि महाडिक गटातील संघर्षाची किनार होती. शौमिका महाडिक  यांनी ज्या पद्धतीने घेरण्याचा प्रयत्न केला तो पाहता आगामी संघर्षाची आज ठिणगी पडली आहे यात शंका नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या